Jalgaon News: जळगावात शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. समीर शेख राज मोहम्मद असं मृताचे नाव आहे. मिस्तरी म्हणून काम करणाऱ्या युवकावर कामाच्या ठिकाणी मृत्यूने गाठले आहे. या घटनेने संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हायलाइट्स:
- तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
- कामाच्या ठिकाणी करुण अंत
- समीर शेख राज मोहम्मद असं मृताचे नाव
मिळालेल्या माहितीनुसार, समीर शेख हा आपल्या आई आणि लहान भावासोबत शाहू नगरातील इंदिरात नगरात वास्तव्याला होता. बांधकामाच्या ठिकाणी मिस्तरी म्हणून काम करुन तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. खेडी शिवारातील कालिंका माता मंदिर परिसरात बांधकामाचे काम सुरू होते. त्याठिकाणी समीर शेख हा काम करत होता. समीर शेख हा बुधवारी नेहमीप्रमाणे बांधकामाच्या ठिकाणी कालिंका माता मंदिर परिसरात कामावर गेला.
याठिकाणी कामाला सुरुवात झाली. या बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या बोरींगच्या वायरचा स्पर्श झाल्याने जोरदार विजेचा धक्का समीर शेखला बसला. या विजेच्या धक्क्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याठिकाणी काम करणाऱ्या इतर कामगारांना घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने वीजपुरवठा बंद केला. तसेच समीरला स्थानिक रहिवाशी नागरिकांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. शेख समीर याची प्राणज्योत मालवली होती.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी समीरला मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी तसेच समीरचे सहकारी कामगार आणि मित्र परिवाराने मोठी गर्दी केली होती. दरम्यान घरातील कर्त्या समीर शेख तरुणाच्या मृत्युमुळे त्याच्या आई तसेच भावाने जिल्हा रुग्णालयात मोठा आक्रोश केला. समीरच्या मृत्यूमुळे बांधकाम साईटवर बुधवारी दिवसभर काम बंद ठेवण्यात आले होते. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीवरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश वसंत माळी हे करीत आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.