नागपूर: वडिलांची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो त्यांच्या अस्थी विसर्जनासाठी भारतात आला. आधीच करोना आणि विलगीकरणाचे संकट, त्यात त्याचे पैसे आणि सामान चोरीला गेले. कुणीच त्याची मदत करेना. अखेर दुतावास गाठण्यासाठी तो पायीच दिल्लीला निघाला. फिरत फिरत नागपुरात आला. नशिबाने या ब्रिटीश नागरिकाची गाठ नागपूर पोलिसांशी पडली आणि त्याच्या पायपीटीला व दैन्यावस्थेला विराम मिळाला.

ऑस्टीन व्यंकटेश नागा परमाबटुरी ऊर्फ व्हॅप नागा (वय ३७, रा. अ‍ॅम्बा हाऊस, लंडन) असे या ब्रिटीश नागरिकाचे नाव आहे. त्याच्या भारतीय वंशाच्या वडिलांचे १२ जून २०१९ निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनासाठी तो १९ मार्च रोजी ब्रिटनहून आंधप्रदेशातील गुडूर येथे दाखल झाला. याच काळात करोनामुळे देशव्यापी लॉकडाउनची घोषणा झाली. तेव्हापासून त्याच्या पायाला चाकं लागली. तो वाराणसी, अमृतसर, कटरा, वैष्णोदेवी, गोवा, मंगलोर, मदुराई अशा ठिकाणी फिरला. प्रत्येक ठिकाणी त्याला विलगीकरणाला तोंड द्यावे लागले. या काळात त्याची कागदपत्रांची आणि पैशांची बॅग चोरीला गेली आणि त्याची दैनावस्था सुरू झाली. इंग्रजी भाषिक असल्याने त्याला स्थानिकांशी संवाद साधता येत नव्हता. परिणामत: त्याला मदतही मिळत नव्हती. इतर राज्यातील पोलिसही त्याचे ऐकून घ्यायला तयार नव्हते. घरी परतण्यासाठी ब्रिटीश दुतावासाला संपर्क साधणे आणि त्यासाठी दिल्लीत पोहोचणे गरजचे होते. अखेर त्याने पायदळच दिल्लीच्या गाठळण्याचे ठरविले.

रस्त्यात मिळेल ती मदत घेत व्हॅप १८ ऑगस्टला रोजी नागपुरात पोहोचला. इंदोरा चौकात तो दिल्लीचा रस्ता विचारू लागला. इंग्रजी भाषा न समजल्याने येथील स्थानिकांनी त्याला वाहतूक पोलिसांपर्यंत पोहोचविले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार मालवीय यांनी त्याची चौकशी केली असता हा सगळा प्रकार समोर आला. प्रथम पोलिसांना त्याच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार केले. दिल्लीतील ब्रिटीश दुतावासाशी संपर्क साधून व्हॅपला रेल्वेचे तिकिटही काढून दिले. अनेक राज्यांमधील पोलिसांकडून मिळालेल्या तुच्छ वागणूकीनंतर नागपूर पोलिसांनी केलेल्या मदतीमुळे त्याचेही डोळे पाणावले. अखेर शुक्रवारी २० ऑगस्ट रोजी व्हॅप दिल्लीतील ब्रिटीश दुतावासात पोहोचला.

आभाराचा फोन

तीन चार महिन्यांच्या कालावधीत इतर राज्यांमध्ये मिळालेल्या तुच्छ वागणुकीनंतर व्हॅपच्या मनात भारतीयांबद्दल प्रचंद द्वेष निर्माण झाला होता. मात्र नागपूर पोलिसांनी ही प्रतिमा बदलली. दिल्लीला पोहचल्यानंतर व्हॅपने नागपूर पोलिसांना फोन केला आणि त्यांचे आभार मानले. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, वाहतूक पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार मालवीय, हवालदार मोहन केवटकर, अनिल चांदुरकर, राहुल लोखंडी, देवेंद्र निलंकर आणि विजय धवड यांनी व्हॅपला मदत केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here