: कात्रज परिसरात मित्राचा खून करून त्याचा मृतदेह घरातच पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीने नवरा बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मित्राच्या घरात गेल्यानंतर दुर्गंधी येऊ लागल्यामुळे या खुनाचा उलगडा झाला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

किरण शिवाजी डोळे (वय २७,रा. दुगड चाळ, आयप्पा मंदिराजवळ, कात्रज) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या गुन्ह्यात फरार झालेल्या संशयित आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण डोळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. चार दिवसांपूर्वी डोळे हा ओमकार जोरी या मित्राकडे जातो, असे सांगून घरातून गेला. मात्र, त्यानंतर घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या पत्नीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. डोळे राहत असलेल्या भागात त्याचा मित्र ओमकार जोरी हा त्यांच्या आजीकडे रहात होता. डोळे हा बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांनी आजीसह जोरी बंधू अचानक निघून गेले. त्यामुळे डोळे याच्या कुटुंबियांना त्याच्यावर संशय निर्माण झाला होता. ते लोणावळा परिसरातील नातेवाईकांकडे रहावयास गेले. आजीने त्यांच्या नातेवाईकांना कात्रजमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले. नातेवाईकांनी त्याची माहिती लोणावळा पोलिसांना दिली. खूनाचा प्रकार असल्याने भारती विद्यापीठ पोलिसांना लोणावळा पोलिसांनी गुरूवारी रात्री खबर देताच तपासाला सुरूवात झाली.

झोन दोनचे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त सर्जेराव बाबर, वरिष्ठ निरीक्षक वसंत कुंवर, विष्णु ताम्हाणे, उपनिरीक्षक महेंद्र पाटील आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी आरोपीचे तीन खोल्याचे घर आहे. त्या घरात थोडी मोकळी जागा. त्या ठिकाणी दुर्गंधी येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी शुक्रवारी दुपारी जोरी याच्या घरात खोदल्यानंतर डोळे याचा पोत्यात बांधलेला मृतदेह आढळून आला. तो सडलेल्या अवस्थेतील मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठवून दिला आहे. याप्रकरणातील आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आले आहेत. आरोपींची काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. त्यामधून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस अधिक तपास करत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here