मुंबई : करोनाचे संकट आणि अर्थव्यवस्थेत मंदीचा प्रभाव असला तरी त्या तुलनेत शेअर बाजारात तेजीची दौड सुरूच आहे. आर्थिक स्थिती आणि शेअर बाजारातील तेजीचा ताळमेळ बसत नसून बाजारात मोठी घसरण होईल, असे भाकीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांनी व्यक्त केले आहे.

मागील दोन महिन्यात शेअर बाजारात अनपेक्षित तेजी दिसून आली आहे. सीएनबीसी आवाज या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दास यांनी हे भाकीत केले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत प्रचंड रोकड उपलब्धता आहे. त्यामुळेच शेअर बाजारात तेजी असून वास्तविक आर्थिक परिस्थितीच्या विरोधाभासी आहे, असे दास यांनी सांगितले. त्यामुळे भांडवली बाजारात नक्कीच मोठी घसरण होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. मात्र ही घसरण कधी होईल, हे नक्की सांगता येणार नाही, असेही दास यांनी स्पष्ट केले.

शेअर निर्देशांकातील तेजीचा विचार केला तर एप्रिलपासून आतापर्यंत निफ्टी ५० निर्देशांकात ३५.२ टक्के तर सेन्सेक्समध्ये ३५.२ टक्के वाढ झाली आहे. याच महिन्यात रिझर्व्ह बँकेने पतधोरण स्थिर ठेवले होते. मात्र व्याजदर कपातीसाठी अजूनही संधी असून योग्य वेळी ती वापरू असे संकेत शक्तिकांत दास यांनी यावेळी दिले होते.

रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारीपासून आतापर्यंत रेपो दरात १.१५ टक्के कपात केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात बँकेने १.३५ टक्क्याने रेपो दर कमी केला होता. अजूनही पतधोरणाला शिथिल करण्याची संधी आहे. भविष्यात वेळ पडल्यास त्याचा उपयोग करू असे दास यांनी सांगितले. करोनाने अर्थव्यवस्थेला बेजार केले असले तरी दुसऱ्या तिमाहीपासून सुधारणा होत आहे. मात्र यंदा विकासदर उणे राहील यात दुमत नाही, असे दास यांनी स्पष्ट केले. जूनपासून महागाई वाढत असल्याकडे त्यांनी लक्ष आकर्षित केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here