महाराष्ट्रात झालेल्या सर्वात मोठ्या सत्तांतराच्या नाट्यमय घटनेबाबत काही गोष्टींचा खुलासा मंत्री दीपक केसरकर यांनी नुकताच केला. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना परमेश्वर दीर्घायुष्य देवो. परंतु ज्या पद्धतीने दीपक केसरकर यांनी बंडाबाबत काही गोष्टींचा खुलासा केला, बंड अयशस्वी झाल्यास काय झाले असते हे सांगितले, त्यातून स्वाभाविकच काही प्रश्न निर्माण होतात’ असे तपासे म्हणाले.
एकेकाळी अमर्यादित असे अधिकार मुख्यमंत्री शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या तत्कालीन शिवसेनेमध्ये होते. ते ठरवतील ती पूर्व दिशा, एवढा मान उद्धव ठाकरे कुटुंबाने दिला होता, याची आठवण तपासे यांनी करुन दिली. आज शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावर बसून देखील भाजपच्या इशाऱ्यावर चालावे लागते आहे ही शोकांतिका आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत किती जागा शिंदे गटाला मिळतील याची शिंदे समर्थकांना खात्री नाही असे तपासे म्हणाले. बंडाच्या काळात शिंदे यांच्या मनावर नक्कीच दडपण असू शकेल. पण त्यापेक्षा मोठा दबाव आज भाजपचा आहे हे कोणी नाकारू शकत नाही, असा टोला राष्ट्रवादीने लगावला आहे.
दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले होते?
ज्यादिवशी एकनाथ शिंदेंचा अपमान झाला तो दिवस वर्धापन दिनाचा होता. वर्धापन दिनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या एक नंबरच्या शिलेदाराचा अपमान केलात, त्याला खालच्या दर्जाची वागणूक दिली. ते रागावून निघून गेले होते, तरीही त्यांची परत येण्याची तयारी होती. शिंदे साहेब हा एक सच्चा शिवसैनिक, सच्चा माणूस आहे. त्यांनी सांगितलं होतं की, मला ज्यावेळेस असं वाटायला लागलं की, माझा हा उठाव यशस्वी होणार की नाही, तेव्हा मी एकच गोष्ट केली असती. मी माझ्यासोबत आलेल्या सर्व आमदारांना परत पाठवून दिले असते. त्यानंतर मी उद्धव ठाकरे यांना एक फोन केला असता. त्यांना सांगितलं असतं की, माझी चूक झाली, पण या लोकांची काहीच चूक नाही. त्यानंतर मी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती. असं म्हणणारा मनुष्य कुठल्या दर्जाचा असतो, कशा रितीची माणुसकी त्याच्याकडे असेल? एकाही आमदाराचे राजकीय नुकसान होणार नाही, प्रसंगी माझा जीव गेला तरी चालेल, असं म्हणणाऱ्या माणसाच्या पाठिशी लोकं उभी राहणार नाहीत, तर कोणाच्या पाठिशी उभी राहणार, असा सवाल दीपक केसरकर यांनी विचारला.