कोल्हापूर : बांधकामासाठी पाणी साठवणूक करून ठेवण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून दीड वर्षाच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना कोल्हापुरातील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील सुदान फार्मा कंपनीमध्ये घडली आहे. या घटनेची नोंद हुपरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विराज अमोल मालवाणे असं सदर लहानग्याचं नाव असून या घटनेची नोंद हुपरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून देण्यात आलेली माहिती अशी की, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये सुदान फार्मा या कंपनीचे तळंदगे गावानजीक बांधकाम सुरू आहे. यासाठी पाणी साठवून ठेवण्यासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. सदर खड्ड्यात पाणीही भरण्यात आले आहे. या कंपनीमध्ये अमोल अशोक मालवाणे (रा. यळगूड) हे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असून सहपरिवार येथेच कंपनी आवारातच वास्तव्यास आहेत. बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांचा दीड वर्षाचा मुलगा विराज अमोल मालवाणे हा खेळत खेळत घराबाहेर आला आणि घरानजीक पाणी साठवून ठेवण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडला. थोड्यावेळाने बाळ कुठेच दिसत नसल्याचे आई-वडिलांच्या लक्षात आले आणि त्यांनी सर्वत्र शोधाशोध करण्यास सुरुवात केली.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा; प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

अंबरनाथच्या तरुणाला वर्दीचा मान, लष्करात लेफ्टनंट म्हणून रुजू, क्लासविना पहिल्याच प्रयत्नात यश

यावेळी विराज खड्ड्यातील पाण्यात पडलेला त्यांना आढळून आला. त्याला तत्काळ पाण्याबाहेर काढून उपचारासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेची नोंद हुपरी पोलिसांत झाली असून पुढील तपासासाठी हे प्रकरण गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

दरम्यान, अवघ्या दीड वर्षाच्या विराजच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here