पुढच्या ३-४ दिवसांमध्ये मान्सून जोर धरेल….
भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भाच्या काही भागांमध्ये आज मान्सूनचं आगमन झालं तर पुढच्या ३-४ दिवसांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणाच्या आणखी काही भागांमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस पुढे जाण्याची परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे पुढच्या ३-४ दिवसांमध्ये मान्सून जोर धरेल असं हवामान खात्याने म्हटलं आहे.
मान्सून कुठे आला आहे…
दरम्यान, सध्या केरळपासून मान्सूनची वाटचाल सुरू झाली होती. तो मान्सून आता कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या बहुतांश भागात पोहोचला आहे. इतकंच नाहीतर महाराष्ट्रातल्या विदर्भात आणि ओडिसा, छत्तीसगडच्या काही भागांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. तसेच झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्येही मान्सून पोहोचेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
आज विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. अमरावती जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाली. यंदा मान्सून लांबल्याने बळीराजाही चिंतेत होता. मात्र, विदर्भात पडलेल्या पावसाच्या पहिल्या सरींनी शेतकऱ्यांचा आनंद फुलला आहे तसेच पश्चिम विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्येही पावसाच्या सरी कोसळल्याची माहिती आहे.
आज कुठल्या शहरांमध्ये पावसाने लावली हजेरी…
आज मुंबईसह उपनगरांमध्ये, ठाणे, नवी मुंबई अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी बसल्या. कल्याण-डोंबिवलीमध्येही मुसळधार पाऊस झाला. अंबरनाथमध्येदेखील पावसाला सुरुवात झाली. सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. पण उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागांमध्ये पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडल्याचं पाहायला मिळालं. रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला.