नागपूर: विषाणू प्रादुर्भावाची साखळी आता विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत पोचली आहे. शुक्रवारी विभागीय आयुक्तांचा चालक आणि सुरक्षा रक्षकही करोनाच्या विळख्यात अडकल्याने आता डॉ. संजीव कुमार यांच्यावरच विलगीकरणात राहण्याची वेळ ओढवली आहे. या दोघांनाही तुर्तास सौम्य लक्षणे असली तरी आयुक्तांनी तातडीने आपली करोना चाचणी करून घेतली. मात्र सुदैवाने त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. या घडामोडीत जिल्ह्यात आज दिवसभरात १०२४ जणांना करोना विषाणूने गाठले. त्यामुळे बाधितांच्या साखळीने आज चौथ्या दिवशीही हजाराचा आकडा कायम ठेवला. तर दुसरीकडे जिल्ह्यात करोनाची लागण झाल्यानंतर उपचार घेत असलेले २८ जण दगावले.

करोनाची बाधा होऊन उपचारादरम्या विविध रुग्णालयांमध्ये दगावलेल्यांपैकी २४ जण हे एकट्या शहरातील आहेत. तर २ जण जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तर २ जण परजिल्ह्यातील रहिवासी आहेत. या घटनाक्रमात आज करोना मुक्त होणाऱ्यांच्या संख्येनेही विक्रमी बाजी मारली. आज दिवसभरात जिल्ह्यात ७०० जण सौम्य लक्षणे असल्याने आजार मुक्त झाल्याचे सांगून घरात विलगीकरणात पाठविण्यात आले. नव्याने करोनाच्या विळख्यात अडकलेल्यांपैकी सर्वाधिक ६०४ नमुन्यांचा अहवाल अँटिजन रॅपिड टेस्टमधून पॉझिटिव्ह आला. त्या खालोखाल खासगी प्रयोगशाळांमधून १७७, एम्समधून १०५, मेयोतून ८९, माफ्सूतून २६ आणि मेडिकलमधून २३ जणांच्या घशातील स्राव नमुन्यात करोनाचा अंश आढळला. सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात ८७२७ सक्रिय करोना बाधित विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यातील ५७३४ करोनाबाधित एकट्या शहरातील असून उर्वरित २९९५ हे ग्रामीण भागातील सक्रिय रुग्ण आहेत.

आज दिवसभरात करोनाच्या मिठीत अडकलेल्या १०२४ जणांमुळे आतापर्यंत करोनाबाधितांचा आकडा आता १८७४६ पर्यंत जाऊन धडकला आहे. तर मृत्यू संख्येनेही ६५३ पर्यंत मजल मारली आहे. समाधानाची बाब म्हणजे करोनामुक्तीचा गडगडलेला दर पुन्हा चार टक्क्यांनी वाढून जवळजवळ ५० पर्यंत गेला आहे. मेयोत शुक्रवारी उपचारादरम्यान दगावलेल्यांमध्ये योगी अरविंद नगरातील ५८, मानेवाडातील ६०, सदर सिमेंट रोडवरील ८४,मोहन नगरातील ५५, गोधनीतील प्रसाद नगरातील ६४ वर्षीय पुरुषांसह रेल्वे कॉलनीतील ४५, पांडे लेआऊट येथील ७४ वर्षीय महिलांचा समावेश आहे.

आजचा अहवाल

आजचे पॉझिटिव्ह -१०२४
आतापर्यंत पॉझिटिव्ह- १८७४६
आज बरे झालेले रुग्ण- ७००
आतापर्यंक करोनामुक्त- ९३६४
सक्रिय करोना बाधित- ८७२९

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here