पुणे: करोनाच्या पार्श्वभुमीवर यंदा गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. तरीही नागरिकांनी बाहेर पडू नये आणि काही अनुचित प्रकार होऊन नये म्हणून सात हजार पोलिसांचा बंदोबस्त रस्त्यावर तैनात राहणार आहे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस सहआयुक्त रवींद्र शिसवे यांनी केले.

करोनाचा संसर्ग सध्या आटोक्यात आहे. पण, नागरिक उत्सवासाठी बाहेर पडल्यास करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे यंदा श्रींच्या आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणूका निघणार नाहीत. तसेच मंडळांनी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ६० ते ७० टक्के मंडळांनी मंदिरातच गणेश उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. ज्या मंडळांना मंदिर नाहीत, त्यांना छोटे मंडळ उभे करण्यास परवानगी दिली आहे. उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार असला तरी पोलिसांचा बंदोबस्त दरवर्षीप्रमाणेच असणार आहे. या बंदोबस्तात करोनाच्या पार्श्‍वभूमीवर विशेष काळजीही घेतली जाणार आहे.

पहिल्या दिवशी गर्दी होऊ नये म्हणून बंदोबस्त राहणार आहे. तसेच, घरगुती गणपतीचे सोसायटीत विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरीही नागरिकांनी बाहेर पडू नये त्यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणेश उत्सवासाठीच्या बंदोबस्तामध्ये सुमारे सात हजार पोलिस कर्मचारी, सातशे अधिकारी आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्यांचा समावेश राहणार आहे. शहरात गणेशोत्सवात गुन्हे घडू नयेत म्हणून गुन्हे शाखेचा वेगळा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक झोननुसार गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकामध्ये १०० कर्मचारी असतील. त्याबरोबरच घातपातविरोधी कारवाईसाठी विशेष शाखेचाही बंदोबस्त राहणार आहे. बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. वाहतूक पोलिसांकडूनदेखील बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, शहर व जिल्ह्यात मृत्यूसंख्येप्रमाणे आता रुग्णसंख्याही वाढली आहे. गुरुवारी ३५४४ जणांना संसर्ग झाला असून जिल्ह्यात ७१ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. विघ्नहर्ता गणरायाचे आगमन होत असताना त्या पार्श्वभूमीवर वाढती रुग्ण आणि मृत्यूची संख्या चिंताजनक स्थिती पुन्हा निर्माण होत असल्याची चिन्हे आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णसंख्याही गुरुवारी पाचशेच्या पुढे गेली आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवडमधील रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसापासून दिसत आहे. त्यामुळे गांभिर्य वाढत आहे. दुसरीकडे काही दिवसांपासून मृत्युमुखींची संख्याही दोन्ही शहरात वाढत असल्याने चिंता वाढली आहे. शहर व जिल्ह्यातील चाचण्यांची संख्या आता सहा लाखांच्या जवळ पोहोचली आहे. पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भागातही संसर्ग वाढत असल्याने त्या ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याचे चित्र आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here