यवतमाळ: संसारात अर्ध्यावरच डाव मोडून पती स्वर्गवासी झाला. त्यात कपाळी वैधव्य आल्याने आपल्या तीन अपत्यांना कवटाळून संसाराचा गाडा महिला चालवत होती. दरम्यान, घरात कुणीही नसल्याची संधी साधून अज्ञात मारेकऱ्याने विधवेच्या छातीसह गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून तिची निर्घृण हत्या केली. खुनाची ही घटना आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे उघडकीस आली आहे.
अल्पवयीन मुलीशी स्नॅपचॅटवर ओळख;आक्षेपार्ह अवस्थेतील फोटोंच्या आधारे ब्लॅकमेल, आरोपी अटकेत
मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता दत्ता मुधोळकर (४०) असे मृतक विधवा महिलेचे नाव आहे. काही वर्षांपूर्वीच तिचा पती मरण पावला. त्यामुळे दोन मुली आणि आठ ते नऊ वर्षाच्या मुलाला घेऊन ती उदरनिर्वाह करत होती. त्यातच दोन्ही मुलींचे लग्न झाल्याने त्या सासरी नांदायला गेलेल्या आहेत. दरम्यान, आपल्या लहान मुलाला सोबत घेऊन ती राहत होती. गावात मिळेल ती मोलमजुरी करून मुलाचा सांभाळ करायची. दरम्यान २२ जून रोजी नातेवाईकाकडे लग्न समारंभ असल्याने तिचा मुलगा त्या कार्यक्रमासाठी गेला होता. सुनीता काल गुरुवारी रात्री घरी एकटीच होती.

दरम्यान, अज्ञात मारेकऱ्याने तिच्या एकटेपणाचा फायदा घेतला. घरात शिरून मारेकऱ्याने सुनीताच्या छातीसह गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून तिचा खून केला. शुक्रवारी सकाळी सुनीताच्या घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीने सुनीताला घरातून आवाज दिला. मात्र, सुनीताच्या घरातून कोणताही प्रतिसाद अथवा उत्तर मिळत नसल्याने शेजाऱ्यांनी सुनीता झोपेतून का उठत नाही, म्हणून घरात जाऊन बघितले. मात्र, यावेळी दृष्य पाहून त्यांच्या काळजाचा थरकाप उडाला. सुनीताचा रक्तरंजित मृतदेह घरातील खाटेवर पडलेला होता. रक्ताने आजूबाजुची जागा पूर्णतः भिजली होती. त्यामुळे लगेच या घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी गावातील पोलीस पाटलांना दिली.

दर्शनाने लग्नाला नकार दिल्याने आरोपी राहुल हंडोरेनं ट्रेकिंगचा बहाण्याने काढला काटा

पोलीस पाटलांनी तत्काळ घटनास्थळ गाठून घडलेला प्रकार आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्याम सोनटक्के यांना सांगितला. सोनटक्के यांनी कुठलाही विलंब न लावता पथकासह घटनास्थळ गाठले. यावेळी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आर्णीतील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. आता पोलिसांनी या खुनाच्या तपासावर लक्ष केंद्रित केले आहे. सुनीताचा खून कुणी आणि का केला? यासंदर्भात आता पोलिसांनी तपास आरंभ केला आहे. फिर्यादी बाबाराव तिमाजी निंबोळे (३४) यांच्या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

पुढील तपास दारव्ह्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक शिवराज पवार, जमादार सतीश चौधर, अशोक टेकाळे, अरविंद जाधव, मनोज चव्हाण, आहे. ,विशाल गावडे, अतुल पवार हे करीत आहे. सुनीता मुधोळकर ही मोलमजुरी करून आपला संसार चालवायची. विधवा असल्याने तिला दुसरा कुठलाही आधार नव्हता. मात्र, तिचा खून कुणी का आणि कशासाठी केला. यावरून आता गावात विविध तर्कवितर्क लावले जात आहे. काही जणांमधून घटनेला अनैतिक संबंधाची किनार तर नाही ना, अशाही शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहे. मात्र, सत्य काय, ते आता पोलीस तपासाअंती स्पष्ट होणार आहे.
किंचाळण्याचा आवाज ऐकताच पत्नी घराबाहेर आली, चिंचेच्या झाडाखाली पती रक्ताच्या थारोळ्यात, नेमकं काय घडलं?
बोरगावातील विधवा महिलेच्या खुनातील आरोपीला पकडण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी ठाणेदार श्याम सोनटक्केसह पथकांना दिशानिर्देश दिले. इतकेच नव्हे तर ‘त्या’ अज्ञात मारेकऱ्याला पकडण्यासाठी यवतमाळातून श्वान पथकही बोरगावात पाठविण्यात आले. लुसी नामक श्वानाने घटनास्थळावर इकडून तिकडे फेरा घातला. मात्र, ती जागच्या जागीच घुटमळत असल्याचेही दिसून आले. एकंदरीत पोलिसांनी वेगवेगळ्या तांत्रिक तपासाआधारे या घटनेतील आरोपीला पकडण्याचे जाळे तयार केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here