म. टा. प्रतिनिधी, मुंबई

करोनाच्या सावटाखाली लाडक्या बाप्पांचे आगमन आज, शनिवारी होत आहे. चैतन्याच्या या महाउत्सवात यंदा गणेशभक्तांनी उत्साहासोबत सामाजिक आणि सुरक्षिततेचे भान जपण्याचे आवाहन सातत्याने राज्य शासनाकडून केले जात आहे. मात्र लॉकडाउनमुळे बराच काळ घरात अडकून पडलेले नागरिक विशेषतः गृहिणी शुक्रवारी, खरेदीसाठी बाहेर पडल्याने मुंबईसह उपनगरांत सुरक्षित वावराचा पुरता फज्जा उडालेला दिसला. अर्थात याही गर्दीत विघ्नहर्त्याच्या आगमनाने करोनारूपी विघ्न कायमचे दूर होईल, असा सकारात्मक भाव गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर झळकत होता. अनेक गणेशभक्तांच्या घरी एक दिवस आधीच गणरायाचे आगमन झाले.

शुक्रवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसातही बाप्पाच्या आगमनासाठी, सामान खरेदीसाठी तुफान खरेदी सुरू होती. जणू शहरात करोनाचा संसर्ग नाहीच याच आविर्भावात मुंबईकरांनी दिलखुलास खरेदीला झुकते माप दिले. शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे चिखल, वाहतूककोंडीमध्ये झालेली वाढ अशा समस्यांना गणेशभक्तांना सामोरे जावे लागले. भाज्या, फळे, फुलांपासून, पूजेचे साहित्य, कपड्यांपर्यंत सर्वच दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. अनलॉक सुरू असला तरी विनाकारण संचारावर बंदी असल्यामुळे यंदा गणेशभक्तांच्या गर्दीचे प्रमाण कमी असेल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र चैतन्य घेऊन येणाऱ्या या बुद्धीच्या आणि कलेच्या देवतेचे स्वागत करण्यात मुंबईकरांनी गर्दीच्या बाबतीत कुठलीही कसर न सोडल्याचे दिसून आले.

चित्रशाळांमध्ये नियमांचे पालन
यंदा करोनाचे सावट असल्याने मंडपातील गर्दी टाळण्यासाठी अनेक मूर्तिकारांकडून मूर्ती नेण्यासाठी वेळा ठरवून देण्यात आल्या होत्या. अनेकांनी गुरुवारीच मूर्ती घरी नेण्यास सांगितल्याने चित्रशाळांमधील सुरक्षित वावराचे नियम बऱ्यापैकी पाळल्याचे दिसले. गणेशभक्तांनी आवर्जून मास्क, हातमोजे घालण्यावर भर दिला होता. तर मूर्तिकारांकडून सॅनिटायझेशन, सुरक्षित वावराचे नियमांचे पालन करता यावे यासाठी येण्या-जाण्याच्या मार्गावर विशेष सोय करण्यात आली होती. सामानाच्या खरेदीसाठी दिसणारी अलोट गर्दी गणपती आगमनावेळी मात्र जाणीवपूर्वक टाळण्याबाबत मात्र मुंबईकरांनी समंजसपणा दाखवला. आगमनाच्या वेळी वयस्कर मंडळी तसेच बच्चेकंपनीचा सहभाग टाळण्यात आला होता. जवळच्या अंतरासाठी देखील मुंबईकरांनी स्वतःचे वाहन किंवा रिक्षा, हातगाडीचा उपयोग करण्यास प्राधान्य दिले. विशेष म्हणजे, समाजप्रबोधनासाठी आपल्या बाप्पाला मास्क लावला होता. या गणेश उत्सवात मूर्ती, मखर, मोदक यासोबत चौथा ‘म’ म्हणून मास्कला प्राधान्य देण्याचे आवाहन सोशल मीडियावर होताना दिसत आहे.

यंदा प्रथमच गर्दीला ओहोटी

आज, शनिवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुढील दहा दिवस मुंबई पहिल्यांदाच गजबललेली दिसणार नाही, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने हा अंदाज खरा ठरवण्यासाठी मुंबईकरांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. यंदा मंडळांमध्ये देखील नेहमीप्रमाणे गर्दी होणार नाही हे स्पष्ट आहे. पालिकेच्या नियमांनुसार नियमांमध्ये कुठलाही हलगर्जीपणा होताना दिसल्यास थेट कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे लालबाग-परळ, धारावी, खेतवाडी, पूर्व-पश्चिम उपनगरातील अनेक भागांमध्ये मंडळांबाहेरील गर्दी यंदा मात्र दिसणार नाही.

सुरक्षित वावराचा फज्जा

एकीकडे गणेशोत्सवासारख्या गर्दीच्या उत्सवातील उत्साह, तर दुसरीकडे करोनासारख्या महामारीपासून वाचण्यासाठी सुरक्षित वावर राखण्याबाबत शासनाकडून होणारे आवाहन याची जुगलबंदी मुंबईत दिसून आली. मात्र शुक्रवारी हा डाव गर्दीने जिंकलेला पाहायला मिळाला. मुंबईतील बाजारपेठांमध्ये गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. गर्दी वाढल्यामुळे साहजिकच सुरक्षित वावराचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. मात्र उत्सवाची पार्श्वभूमी लक्षात घेत यंत्रणांकडून देखील सामोपचाराची भूमिका घेण्यात आल्याचे दिसून आले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here