सातारा : मैत्रिणीच्या हाताला जखम झाल्याने समर्थनगर येथील दवाखान्यात एक तरुण तिला घेऊन आला. मात्र, क्लिनिक बंद असल्याचे पाहून संतप्त झालेल्या तरुणाने खिशातून पिस्तूल काढून जमिनीवर गोळी झाडली. सुदैवाने या गोळीबारामध्ये कोणीही जखमी झाले नाही. ही धक्कादायक घटना साताऱ्यातील कोडोली परिसरात रविवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घडली. गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे. नेताजी बोकेफोडे उर्फ बंड्या (वय २३, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नेताजी बोकेफोडे हा मैत्रिणीच्या हाताला जखम झाल्याने उपचारासाठी तिला स्कूटीवरून घेऊन कोडोलीतील समर्थनगरमध्ये असलेल्या गणेश क्लिनिक येथे आला होता. मात्र, रविवारी क्लिनिकला सुट्टी असल्याने दवाखाना बंद होता. दवाखाना बंद असलेला पाहून त्याला राग अनावर झाला आणि क्लिनिकच्या समोरच त्याने खिशातून पिस्तूल काढून जमिनीवर गोळी झाडली. गोळीबाराच्या आवाजाने आजूबाजूचे लोक तेथे धावत आले. त्यानंतर तो मैत्रिणीला घेऊन तेथून निघून गेला.

जंगली रम्मी खेळून तुम्ही किती पैसे जिंकलात हे बेरोजगारांना सांगा; मुखेडच्या तरुणाचं थेट अजय देवगणला पत्र

या प्रकाराची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तरुणाच्या गोळीबारात कोणी जखमी झाले नसले तरी, दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने कोडोली परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे गतीने फिरवून तासाभरातच नेताजी बोकेफोडे याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून जर्मन बनावटीचे पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहे. त्याने हे पिस्तूल कोणाकडून खरेदी केले होते, याचा पोलीस तपास करीत आहेत.

कोल्हापुरातील बड्या उद्योगपतीचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त; अखेर महिला नगरसेविकेसह पोलीस ताब्यात
पोलिसांनी नेताजी बोकेफोडेला ताब्यात घेतल्यानंतर त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडून चुकून गोळी झाडली गेल्याचे त्याने सांगितले. मात्र, बंदूक परवाना नसताना त्याने हे शस्त्र बाळगल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.

महिलेच्या घरी चोरी, संभाजीनगर पोलिसांचा झटपट तपास, चोरटा निघाला तिचाच नवरा, प्रकरण काय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here