आपल्या देशात तुळशीला धार्मिक महत्त्व जास्त आहे. समुद्र मंथनावेळी ज्यावेळी अमृत जमिनीवर सांडले, त्यातून तुळशीची उत्पत्ती झाली, असे मानले जाते. ग्रहणकाळात शुद्धीकरणासाठी तुळशीच्या पानांचा वापर केला जातो.
ग्रहणकाळात घरात येणाऱ्या अशुद्ध हवेपासून पाणी, अन्नधान्य, खाद्य पदार्थांचे संरक्षण व्हावे, यासाठी त्यावर तुळशीची पाने ठेवली जातात. तुळशीच्या पानांमुळे दुषित हवेचा परिणाम होत नाही. नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळते, अशी मान्यता आहे.
ग्रहण लागण्यापूर्वी तुळशीची पाने पाण्यात टाकावीत आणि त्या पाण्याने आंघोळ करावी, असे सांगितले जाते. तसेच पिण्याच्या पाण्यातही तुळशीची पाने टाकून ठेवावीत. यामुळे ग्रहणकाळात पाणी दुषित होत नाही, असे मानले जाते.
ज्योतिषशास्त्राप्रमाणे तुळशीमध्ये पारा असतो. त्याचप्रमाणे तुळशीत अनेक औषधी गुणधर्म असतात. आरोग्यासाठी तुळशी वरदान आहे. तुळशीपत्रांमध्ये असलेल्या पाऱ्यामुळे कोणत्याही दुषित किरणांचा त्यावर प्रभाव पडत नाही. यासाठी तुळशीची पाने पाणी, अन्नधान्य, खाद्य पदार्थांवर ठेवावीत, असे सांगितले जाते.
खास करून घरातील लोणचे, मुरंबा, दूध, दही आणि अन्य खाद्य पदार्थांवर ग्रहणकाळात तुळशीपत्र ठेवावे, असे मानले जाते. ग्रहणकाळानंतर करण्यात येणाऱ्या पूजाविधीमध्येही तुळशीच्या पानांचा उपयोग करावा, असे सांगितले जाते.
वर्ष २०२० मधील आगामी ग्रहणेः
१० जानेवारी – चंद्रग्रहण
५ जून – चंद्रग्रहण
२१ जून – सूर्यग्रहण
५ जुलै – चंद्रग्रहण
३० नोव्हेंबर – चंद्रग्रहण
१४ डिसेंबर – सूर्यग्रहण
खगोल शास्त्रानुसार ही निव्वळ खगोलीय घटना आहे. परिक्रमा पूर्ण केल्यानंतर पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्यामध्ये येते तेव्हा चंद्र झाकला जातो आणि चंद्रग्रहण पाहायला मिळते. जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान पृथ्वी येते तेव्हा सूर्याची किरणे चंद्रापर्यंत पोहोचत नाही. त्यावेळी चंद्रग्रहण लागले, असे मानले जाते. पृथ्वीच्या चोहोबाजूला फिरणारा चंद्र हा पृथ्वीचा एक उपग्रह आहे. ग्रहणाच्या दिवशी खाण्यापिण्यापासून ते पूजाअर्चा करण्यापर्यंतची अनेक बंधने धार्मिक मान्यतेनुसार टाकण्यात आली आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times