म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मान्सूनचे आगमन झाल्यानंतर, पुढील दोन दिवस राज्यात सर्वदूर पाऊस होण्याचा अंदाज आहे. नाशिक, मुंबईसह पालघर, ठाणे जिल्ह्यांनाही मंगळवारी, तर पालघर आणि रायगड जिल्ह्याला बुधवारी ऑरेंज अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. पुण्यासह अन्य काही जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी रविवारी पावसाने हजेरी लावल्यानंतर, सोमवारी मुंबईच्या उपनगरांसह कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई या पट्ट्यामध्ये पाऊस होता. सकाळी सातपासून सायंकाळी सात वाजेपर्यंतच्या १२ तासांमध्ये या भागांमध्ये २० ते ४० मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. कोकण पट्ट्यामध्ये रत्नागिरी, रायगड ते पालघरपर्यंत मंगळवारी पावसाचा जोर वाढून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्याला बुधवारी ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’चा इशारा कायम आहे; तर उर्वरित कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल. सिंधुदुर्गात हा जोर केवळ मध्यम सरींपुरताच मर्यादित राहील, अशीही शक्यता आहे.

Mumbai Forecast: मुंबईत आज अतिमुसळधार पावसाची शक्यता; शहरासह या जिल्ह्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट
पुढील पाच दिवसांमध्ये उत्तर आणि दक्षिण कोकणामध्ये सर्वदूर पावसाचा अंदाजही आहे. या काळात बहुतांश ठिकाणी पाऊस होईल. उत्तर मध्य महाराष्ट्रातही पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी तर त्यानंतर दोन दिवस अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दक्षिण-मध्य महाराष्ट्रात मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस अनेक ठिकाणी पाऊस पडल्यानंतर पुढच्या दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी होईल, अशी शक्यता आहे. मराठवाड्यातही मंगळवारी बहुतांश ठिकाणी पाऊस होऊन नंतर जोर कमी होईल. पूर्व आणि पश्चिम विदर्भात मंगळवारी आणि बुधवारी बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

आज अतिमुसळधार?

नाशिक, पुणे, सातारा येथील घाट परिसरासाठीही तुरळक ठिकाणी मंगळवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात अमरावती, नागपूर येथे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकेल, तर भंडारा आणि गोंदिया येथे तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार पाऊसही होऊ शकेल. या काळात विदर्भामध्ये मेघगर्जनेचीही शक्यता आहे.

राज्यात ७० टक्के तूट

राज्यात मान्सून सक्रिय झाल्यापासून सोमवार सकाळपर्यंत ७० टक्के पावसाची तूट नोंदली गेली आहे. आतापर्यंत १७०.८ मिलिमीटर सरासरी पाऊस राज्यात नोंदला जातो. हा पाऊस आतापर्यंत केवळ ५१.१ मिलिमीटर एवढाच नोंदला गेला आहे.

Pune Rain Updates: पुण्यात येत्या २४ तासांत अतिमुसळधार पावसाच्या सरींची शक्यता, हवामान खात्याचा महत्त्वाचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here