२५ वर्षीय पीडितेचे अमरावती शहरातील रहिवासी आकाश नामक तरुणाशी २३ फेब्रुवारी रोजी लग्न झाले. लग्नात त्यांच्या वडिलांनी जावयाला जवळपास २० तोळे सोने आणि ४०० ग्रॅम चांदी दिली. जावई व त्याच्या कुटुंबीयाच्या सांगण्यावरून लग्नात सुमारे १२ लाख रुपये खर्चही करण्यात आला. लग्नानंतर सासरी नांदायला गेल्यावरच सासू व नणंदेने विवाहितेकडील सोन्या-चांदीचे सर्व दागिने व भेट वस्तू स्वतःच्या ताब्यात घेतले. सासरच्या अन्य मंडळींकडून छळ सुरू असतानाच पती आकाशने बेडरूममध्ये तिचे अश्लील व्हिडीओ व फोटो काढले. तिने नकार दिल्यावर मी तुझा पती आहे, मला व्हिडीओ काढण्याचे पूर्ण अधिकार आहेत, असे म्हणत त्याने त्यांना दम दिला.
या कारणावरून संबंधित महिलेला मारहाणसुद्धा करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता आकाशने या महिलेला दारूसुद्धा पाजली. तिचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. दरम्यान, पीडित विवाहितेचे आई-वडील त्यांच्या घरी गेल्यावर त्यांनासुद्धा मारहाण करण्यात आली. पोलिसांत तक्रार केली, कोर्टात केस दाखल केली किंवा नातेवाईकांना सांगितले, तर तुमच्या मुलीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करेल, अशी धमकी पीडित विवाहितेच्या आई-वडिलांना देण्यात आली. त्यांना शिवीगाळसुद्धा करण्यात आली. या प्रकरणी पीडित विवाहितेने मोर्शी ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.