मुंबई : भारतासह जगभरात करोनावरील लसीची चाचणी विविध टप्प्यात होत आहे. ऑक्सफर्डकडून विकसित केल्या जाणाऱ्या लसीची मानवी चाचणीही मुंबई महापालिका आपल्या रुग्णालयांमध्ये ३२० स्वयंसेवकांवर करणार आहे. पण नायर आणि केईएम रुग्णालयांमध्ये होणाऱ्या चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या रुग्णालयाच्या नितीतत्व समितीने लसीवर आणखी माहिती मागवत काही शंका उपस्थित केल्या आहेत. दोन्ही रुग्णालयाच्या समित्यांची शुक्रवारी बैठक झाली. कोविशेल्ड म्हणजे ऑक्सफर्ड लस केईएम आणि नायर रुग्णालयातील स्वयंसेवकांना दिली जाणार आहे.

सोमवारपूर्वी आयोजकांकडून समितीला माहिती मिळणार नाही. समितीने आणखी माहितीची मागणी केली आहे. पण गणपतीच्या सुट्ट्यांमुळे याला विलंब होणार आहे. आवश्यक ती माहिती मिळाल्यानंतर समितीकडून पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती एका डॉक्टरने दिली.

लसीच्या चाचणीबाबत आयसीएमआर म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने ७ ऑगस्ट रोजी पत्र लिहिलं होतं, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली. पुण्यातील सेरम संस्थेकडून या लसीची निर्मिती होणार आहे. चाचणीसाठी तयार असलेल्या १८६ स्वयंसेवकांनी बुधवारपर्यंत आपल्या नावाची नोंदणी केली आहे. आवश्यक त्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानंतर आम्हाला समितीकडून चाचणीची परवानगी मिळेल. देशातील एकाही केंद्राकडून चाचणी सुरू झालेली नाही. सर्व जण काही ना काही माहितीच्या प्रतिक्षेत आहेत. काही राज्यांना सरकारच्या परवानगीचीही प्रतिक्षा आहे, असं ते म्हणाले. सर्व स्वयंसेवकांना ०.५ मिली डोस दिला जाणार आहे. या लसीचा एकमेव साईड इफेक्ट म्हणझे हलका ताप एक ते दोन दिवसांसाठी येऊ शकतो, असंही त्यांनी सांगितलं.

फक्त निरोगी स्वयंसेवकांनाच चाचणीसाठी निवडलं जाणार आहे. यापूर्वी ज्यांना करोनाची लागण झाली होती, त्यांना चाचणीत सहभागी होता येणार नाही. देशातील १६०० जणांवर १० केंद्रांवर चाचणी केली जात आहे. याचवेळी अमेरिका आणि ब्राझिलमध्येही चाचणी होईल. या चाचणीतून सुरक्षा आणि प्रतिकारशक्ती तपासली जाईल. करोना लस ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्रा झेनेकाकडून विकसित करण्यात आली आहे. ब्रिटन-स्वीडन कंपनी अॅस्ट्रा झेनेकाने पुण्यातील सेरम संस्थेसोबत भागीदारी केली आहे. सेरमकडून भारतात लसीची निर्मिती केली जाणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here