Ashadhi 2023 :  गेली अकरा वर्षे आषाढी सोहळ्याच्या (Ashadhi Wari 2023) निमित्ताने वारकरी संतांवरील माहितीचा अमोघ ठेवा जगासमोर ठेवणारा ‘रिंगण’ (Ringan) या आषाढी विशेषांकाचे प्रकाशन विठ्ठल रुक्मिणीच्या पायावर ठेऊन करण्यात आले. जेष्ठ पत्रकार सचिन परब हे गेली 11 वर्षे विविध वारकरी संतांच्या आयुष्यातील पाऊलखुणा शोधत त्यांचा अप्रकाशित जीवनपट मांडण्याचा प्रयत्न करीत आले आहेत.  या आषाढीसाठी त्यांनी  परिसा भागवत या वारकरी संप्रदायातील एक महत्वाचा पण प्रसिद्धीस न आलेल्या वारकरी संतांचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. परिसा भागवत यांची कोणतीच माहिती सध्या अस्तित्वात नसताना परब आणि त्यांच्या टीमने हे दिव्य पेलले. परिसा भागवत यांच्यावरील ‘रिंगण’च्या विशेष अंकाचे प्रकाशन विठ्ठल मंदिरात विठ्ठल रुक्मिणीच्या चरणावर ठेऊन केले. यावेळी मंदिर समिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी हा अंक वारकरी संप्रदायाची उपयुक्त असा माहितीचा खजिना असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

परिसा भागवत हे रुक्मिणीमातेचे भक्त असलेले ब्राम्हण संत होते. त्यांना नामदेव महाराजांचे पहिले शिष्य म्हणून वारकरी संप्रदायात ओळखले जाते. पण त्याशिवाय त्यांनी केलेली क्रांती वेगळीच होती आणि त्या क्रांतीचा दस्तऐवज या अंकात मांडल्याचे परब यांनी सांगितले. संत मांदियाळीत प्रमुख संत असूनही त्यांची माहिती का नाही याचा शोध महाराष्ट्रभर फिरून केल्याचे परब यांनी सांगितले. त्याकाळात एक ब्राम्हण कोणत्याही क्षुद्राला गुरू करून घेत नव्हता. ती क्रांती परिसा भागवतांनी केली होती. एवढा मोठा संत असून केवळ दोन कथा आणि 18 अभंग याच्या शिवाय त्यांच्या बद्दल कोणतीच माहिती उजेडात आलेली नाही.  

संत परिसा भागवत यांचे अभंग , लेखन , चरित्र काहीही उपलब्ध होऊ शकले नाही. आज एवढ्या मोठ्या संतांची ना दिंडी आहे , ना पालखी सोहळा,  ना मठ तरीही त्यांची महानता  या 167 पानांच्या विशेष अंकात देण्याचा प्रयत्न केल्याचे सचिन परब यांनी सांगितले. परिसा भागवत हे रुक्मिणी मातेचे भक्त असल्याने या अंकात रुक्मिणी मातेचा इतिहास शोधताना प्राचीन कथा पासून आजच्या देवबाभळी नाटकापर्यंत कशी आहे याचा शोध घेण्यात आला असल्याचे परब यांनी म्हटले. दरवर्षी आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते  प्रकाशित होणारा रिंगणचा आषाढी विशेष अंक यंदा दोन दिवस आधीच देवाच्या पायावर ठेऊन करण्यात आला.  दरवर्षी रिंगण वाचकांपर्यंत पोचायला आषाढीनंतर दहा दिवस तरी लागायचे. यावर्षी एकादशीला काही अंक विक्रेत्यांकडे पोचणार असल्याची माहिती परब यांनी दिली. 

इतर संबंधित बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here