पुणे: एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिच्या हत्येची घटना ताजी असतानाच मंगळवारी सकाळी घडलेल्या एका घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा मोठी खळबळ माजली. एकतर्फी प्रेमातून शंतनू लक्ष्मण जाधव (वय २२ रा. मुळशी डोंगरगाव ) या तरुणाने एका महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याने वार केले. माथेफिरु शंतनू या तरुणीला ठार मारणारच होता. मात्र, काही तरुण मुलं मदतीला धावून आल्याने या तरुणीचा जीव थोडक्यात बचावला. या सगळ्या प्रकारानंतर संबंधित तरुणीच्या आईने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. शंतनू जाधव आणि संबंधित तरुणी पूर्वी एकाच महाविद्यालयात शिकत होते. अशा मनोरुग्ण लोकांना महाविद्यालयात घेतले जायला नको. एवढेच काय अशा मनोरुग्ण लोकांना जगायचाही अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया तरुणीच्या आईने व्यक्त केली. त्या मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून शंतनू हा माझ्या मुलीला त्रास देत होता. मी शंतूनच्या आईवडिलांना याविषया सांगितले होते. तुमच्या मुलाला समजवा, असे मी त्यांना म्हणाले होते. त्यावर शंतनूच्या वडिलांनी ‘तुम्ही काळजी करु नका, मी बघतो त्याच्याकडे’, असे आश्वासन दिले होते. कालच शंतनूने फोन करुन माझ्या मुलीला धमकी दिली होती. त्यावर मी शंतनूला, ‘वारंवार फोन करायचे नाहीत, मी तुझ्या नावाची पोलिसांत तक्रार करेन’, असे बजावले होते. या गोष्टीचा शंतनूला प्रचंड राग आला होता. यानंतर त्याने कॉलेजमध्ये माझ्या मुलीचा पाठलाग केला. अशा मनोरग्ण मुलांना कॉलेजमध्ये घेतलेच नाही पाहिजे. त्यांना जगायचाही अधिकार नाही, अशी संतप्त भावना तरुणीच्या आईने व्यक्त केली. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत असून आता पोलीस आणि न्यायालय माथेफिरु हल्लेखोरावर काय कारवाई करणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Pune News: माझ्याशी पाच मिनिटं बोल; तरुणीचा पाठलाग करत कोयत्याने वार; सदाशिव पेठेतील A टू Z स्टोरी

रस्त्यात बाईक थांबताच शंतनूने बॅगेतून कोयता बाहेर काढला

शंतनू जाधव आज सकाळी कॉलेजपाशी येऊन थांबला होता. तिला अडवत, मला तुझ्या सोबत बोलायचं आहे असे म्हणाला. मात्र, या गोष्टीला तरुणीने नकार दिला. यानंतर तरुणीने तिच्या मित्राला बोलून घेतलं आणि दुचाकीवरुन तेथून निघाले असता आरोपीने त्यांचा पाठलाग करत व जोरजोरात रस्त्यावर शिव्या देत होता. यावेळी तरुणीच्या मित्राने स्वाद हॉटेलच्या समोर दुचाकी थांबवून शंतनूला जाब विचारला. गाडी थांबताच शंतनूने बॅगेतून कोयता बाहेर काढला आणि तरुणीवर वार केला. मात्र, हा वार चुकवून तरुणी निसटली आणि पुढे धावत गेली. शंतनूने तरुणीच्या मित्रावर कोयत्याचा वार करुन त्यालाही पळवून लावले. यानंतर शंतनू कोयता घेऊन तरुणीच्या पाठिशी लागला. सदाशिव पेठ परिसरातील टिळक रोड ते पेरु गेट पोलीस स्टेशनपर्यंत मुलगी आपला जीव वाचवत पळत होती. धावता धावता ही तरुणी दोनवेळा खाली कोसळली. ही तरुणी खाली पडतात शंतनू तिच्या डोक्यात कोयत्याचा घाव घालणार होता. तितक्यात एका तरुणाने त्याचा हात पकडला आणि दुसऱ्या तरुणाने शंतनूच्या हातामधून कोयता काढून घेतला होता. यानंतर या तरुणांनी शंतनूला पकडून पोलीस ठाण्यात नेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here