पोलीस उपमहानिरीक्षक मोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप करणारी १७ वर्षीय मुलगी सोमवारपासून बेपत्ता होती. तिनं जाण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात आत्महत्या करणार असल्याचा उल्लेख केला होता. हे प्रकरण मिटवण्यासाठी कुटुंबावर दबाव टाकत असल्याचा उल्लेखही तिनं चिठ्ठीत केला होता. या प्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हाही नोंदवला आहे. आत्महत्या करण्यासाठी ती घरातून निघून जाणार होती. त्याचवेळी तिचं अपहरण करण्यात आलं आहे, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता.
एखाद्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या करणार असल्याचा उल्लेख या मुलीनं चिठ्ठीत केला होता. डीआयजीसोबत एकेकाळी कर्तव्यावर असलेला पोलीस कॉन्स्टेबल कुटुंबीयांना धमकावत आहे, असा आरोप मुलीच्या भावानं केला आहे. दिनकर साळवे असं कॉन्स्टेबलचं नाव असून, ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकारी वाहनचालक असल्याची माहिती समोर आली आहे. पीडितेच्या वडिलांनी तक्रार केल्यानंतर साळवे यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान, डीआयजी मोरे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली आहे. मोरे यांच्याविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण गुन्हे शाखेकडे आहे. तसेच मोरे यांच्याविरुद्ध पोलीस महासंचालकांनी सरकारकडे सादर केलेल्या अहवालानुसार, शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. गृह विभागाकडून मिळालेल्या आदेशानुसार, मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, असंही देशमुख यांनी सांगितलं. दरम्यान, मोरे यांना पनवेल कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
बेपत्ता मुलगी उत्तर प्रदेशात?
मित्राच्या मुलीनं डीआयजी मोरेंविरोधात तक्रार केली आहे. विनयभंग केल्याचा आरोप मोरेंवर केला आहे. या प्रकरणातील पीडित मुलगी ही बेपत्ता आहे. त्याआधी तिनं लिहून ठेवलेली एक चिठ्ठी सापडली आहे. आत्महत्या करणार असल्याचा उल्लेख या चिठ्ठीत करण्यात आला आहे. पीडित मुलगी ही तिच्या एका नातेवाइकासोबत उत्तर प्रदेशात गेल्याचं वृत्त आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times