मुंबई : करोनावर प्रभावी ठरणाऱ्या औषधांचा तुटवडा कायम आहे. मुंबई आणि महानगर प्रदेशातील करोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत असला तरी अत्यंत महत्त्वाच्या अशा टोसिलीझुमाब या औषधाचा रुग्णालयांमध्ये अभुतपूर्व तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णावर उपचार करताना हे औषध रेमडेसिविरसोबत मिळून वापरलं जातं. करोनावर मात करण्यासाठी या औषधाने आतापर्यंत मोठी मदत केल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी रेमडेसिविरचाही अचानक तुटवडा निर्माण झाला होता.

टोसिलिझुमाब किंवा अटलीझुमाबचा वापर सायटोकाईम स्टॉर्मचा सामना करत असलेल्या रुग्णांवर केला जातो. ठाण्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आरके मुरुडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे महापालिकेने टोसिलिझुमाबचे १०० इंजेक्शन मागवले आहेत, ज्यापैकी ५५ इंजेक्शनच आतापर्यंत आले आहेत. या इंजेक्शनची आयातच झालेली नसल्यामुळे एक आठवड्यापासून विक्रेत्यांकडेही हे इंजेक्शन उपलब्ध नाही, असं ते म्हणाले.

काळा बाजार रोखण्यासाठी ठाण्यातील खाजगी रुग्णालये रेमडेसिविरप्रमाणे टोसिलिझुमाबची खरेदीही ठराविक केंद्रांवर सहजपणे करू शकतात, जेथून थेट डेलिव्हरी केली जाते. पण सध्या या केंद्रावरही पुरवठा बंद आहे, अशी माहिती मुरुडकर यांनी मुंबई मिररला दिली.

नवी मुंबई महापालिकेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई महापालिकेने टोसिलिझुमाबचे ५०० डोस मागवले आहेत. पण पुढच्या आठवड्यापासूनच पुरवठा सुरू होईल, असं सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे कल्याण डोंबिवली महापालिकाही याच औषधाच्या तुटवड्याचा सामना करत आहे.

फक्त महापालिकाच तुटवड्याचा सामना करत आहेत, असं नाही. तर खाजगी कोविड रुग्णालयांमध्येही हे औषध नाही. अबु सामा यांनी ठाण्यातील वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना १९ ऑगस्ट रोजी या औषधाची प्रीस्क्रिप्शनद्वारे मागणी करण्यात आली. सामा यांचे मित्र हलिम यांनी संपूर्ण ठाण्यात या औषधाची विचारपूस केली, पण कुठेही औषध मिळालं नाही.

दरम्यान, टोसिलिझुमाबमुळे मृत्यू दर कमी होत नसल्याचं काही निर्माता कंपन्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या औषधावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे निर्देश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्याच्या टास्क फोर्सला दिले आहेत. हे औषध करोनावर तितकंसं प्रभावी नाही. त्यामुळे डॉक्टर आणि रुग्णांनी यावर भर देऊ नये असं मला वाटतं. टास्क फोर्स लवकरच यावर निर्णय घेणार आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, रुग्णालयांकडून प्रीस्क्रिप्शनमध्ये या औषधाची मागणी केली जात असल्याने नातेवाईक संपूर्ण शहरात औषधाचा शोध घेत आहेत. भाजप आमदार अमित साटम यांनीही या औषधाचा पुरवठा वाढवावा अशी मागणी केली आहे. साटम यांनी गरजू रुग्णांना या औषधाचा पुरवठा केला होता. पण सध्या अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here