जेव्हा बराच उशीर होऊनही नवरदेव परतला नाही. तेव्हा नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. रात्रभर नातेवाईक त्याचा शोध घेत होते. तसेच, ओळखीचे लोक, मित्रांकडेही चौकशी करण्यात आली. मात्र, नवरदेवाचा काहीही पत्ता लागला नाही. नवरदेवासोबत काहीतर अनुचित तर घडलं नाही ना या भीतीपोटी कुटुंबीयांनी मंगळवारी स्थानिक पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून पोलिसांना त्याचा शोध घेण्याची विनंती केली आहे.
भोराहा गावातील रहिवासी दिनेश महतो यांचा २४ वर्षीय मुलगा जियालालचा २५ जूनच्या रात्री मधौरा पोलीस स्टेशन हद्दीतील नेथुआ गावात राहणाऱ्या तरुणीशी विवाह झाला होता. २६ जून रोजी सकाळी जियाला हा वऱ्हाड्यांसोबत नवरीला घेऊन आपल्या घरी परतला.
२६ जून रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जियालाल मिठाई आणतो असे सांगून घरापासून ३०० मीटर अंतरावर असलेल्या क्वार्टर मार्केटमध्ये गेला. जिथून तो घरी परतलाच नाही. कुटुंबीयांनी रात्री उशिरापर्यंत त्याच्या परतीची वाट पाहिली. मात्र, तो परत आला नाही. मंगळवारी सकाळी सासरच्या मंडळींसह इतर नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला.
त्यानंतर जियालालचे वडील दिनेश महतो यांनी पनापूर पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. बेपत्ता नवरदेवाचा अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. पोलिसांनी लग्नस्थळी अनेकांची चौकशी केली. मात्र, अद्याप या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेलं नाही.