सूर्यकांत आसबे,

पीपीई कीट घालून आलेल्या चोरट्यांच्या टोळीने शहरातील विविध भागातील मोबाईल फोनची सहा दुकाने आज (शनिवार) पहाटे फोडली असून यातून मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅब तसेच रोख रक्कम असा जवळपास ५० लाखाचा ऐवज लंपास केला आहे. कोरोना लॉकडाऊनमधून व्यापारी आता कुठे नव्या उमेदीने व्यवसायाला लागले असतानाच चोरट्यांनी व्यापार्‍यांत पुन्हा घबराहट आणि नाउमेदीचं, तर सोलापूर पोलिसांपुढे आव्हानाची स्थिती निर्माण केली आहे.

चोरटे चार ते पाच जण आहेत ते अलिशान पांढर्‍या गाडीतून आले. यातील दोघा जणांनी पीपीई कीट परिधान केलं आहे. तर इतर दोघांनी एक सारखा चौकडा शर्ट आणि पँट घातली असून त्यांनीही पुर्ण चेहरे झाकले आहेत. गाडीत चालकाला बसवून चार जण चोरी करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आलं आहे. या एकाच टोळीने सहाही चोर्‍या केल्या असल्याचंही सकृतदर्शनी निष्पन्न झालं आहे. शनिवारी पहाटे 1.30 च्या सुमारास सर्वप्रथम 256 गाळे, जुना बोरामणी नाका चौक परिसरातील युनिक एन्टरप्रायझेस हे दुकान चोरट्यांनी फोडलं.

यातील विविध कंपन्यांचे 40 ते 50 मोबाईल हॅन्डसेट आणि रोख रक्कम लंपास केली आहे. यानंतर अर्ध्या तासाच्या अंतरानं दक्षिण कसब्यात बालाजी दत्त मंदिरानजीक असलेलं गायत्री कॉम्प्युटर्स दुकानं शटर समोरुन बाजूनं उचकटलं. आत फारसे लॅपटॉप नव्हते. मुख्य काऊंटरवरील लॅपटॉप चोरट्याने हिस्कामारुन काढला, तसेच याच टेबलमध्ये ठेवलेली 60 हजाराची रोख रक्कम घेतली. यानंतर चौपाड विठ्ठल मंदिर नजीक नवीपेठ दिशेनं असलेल्या अक्षय एंटरप्रायझेस या दुकानाचंही शटर उचकटून आतील 40 वर मोबाईल हॅन्डसेट घेवून पोबारा केला.

यानंतर हीच गाडी आणि याच पेहर्‍याव्याचे सर्वजण 15 मिनिटाच्या अंतरानं म्हणजे 2.30 च्या सुमारास जुन्या एम्प्लॉयमेंट चौकातील धृव हॉटेल समोरील ज्योती टेलिकॉम शो रुम आणि जयसेल मल्टी ब्रँड या दुकानासमोर आले व दोन्ही दुकानं फोडली. चोरट्यांनी ज्योतीमधून डेमो पीस, टॅब आणि मोबाईल तर जय सेल्समधून विविध कंपन्यांचे 40 ते 50 मोबाईल लंपास केले. शोकेसमधील सर्व मोबाईल चोरट्यांनी काढून घेतले. यानंतर 3 च्या सुमारास चोरट्यांनी विजापूर रस्त्यावर असलेल्या एस.जी. सेल्स हे लॅपटॉप मोबाईलचं दुकानं फोडलं. येथेही 30 ते 35 मोबाईल चोरट्यांनी लंपास केले आहेत.

ज्योती टेलिकॉमचे महेश चिंचोळी म्हणाले, आमच्या दुकानात चोरीला गेलेले मोबाईल किमान 15 ते 60 हजार रुपये किमतीचे आहेत. सहाही दुकानातून मिळून 200 मोबाईल चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती पुढे आली असून याची किंमत सरासरी 50 लाखाच्या जवळपास जाते.

दरम्यान चोरटे आणि केलेली चोरी दुकानांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.आलिशान गाडीतून आलेल्या चोरट्यांना शोधण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here