म.टा. प्रतिनिधी, नगर: काही लोक राजकारणासाठी भलेही जातीधर्माचा मुद्दा पेटवत असतील, मात्र सामान्यांच्या मनात माणुसकी कायम असते. ग्रामीण भागात तर असा एकोपा कायम पहायला मिळतो. रक्ताच्या नात्यापेक्षाही मानलेली नातीही यातून पक्की होतात. अशाच एका नात्याचा अनुभव शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे आला. मानलेल्या हिंदू बहिणीच्या दोन मुलींच्या पालनपोषणास मदत करणारा तिचा मानलेला भाऊ मुलींच्या लग्नातही मामा म्हणून धावून आला आणि विधीही पार पाडले.

गेल्या आठवड्यात पार पडलेल्या या लग्नाची सध्या चर्चा आहे. बोधेगाव येथे जुनून ए इंसानियत सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबाभाई पठाण यांच्या घरासमोर भुसारी कुटूंब राहते. पतीशी पटत नसल्याने त्यांची मुलगी सविता दोन मुली आणि एक मुलासह माहेरी निघून आली होती. धुणी भांडी करून सविताने मुलांना वाढविले, शिकविले. घरासमोरच राहणारा बाबाभाई यांना सविता भाऊ मानते. सविता यांना सख्खा भाऊ नाही. अनेक वर्षांपासून हे मानलेले नाते आहे. रक्षाबंधन, भाऊबीज हे सण सख्या नात्याप्रमाणे साजरे करतात. मुलांच्या शिक्षणासाठीही बाबाभाईंनी हातभार लावला. सविता यांची मुलगी गौरी बी.ए. झाली तर धाकटी सावरी हिची बारावी झाली. दोघींच्या लग्नाचे वय झाल्यावर स्थळासाठी शोधाशोध केली. तालुक्यातील मुंगी येथील स्थळ आले. तेथही दोन सख्ये भाऊ लग्नाळू होते. त्यामुळे बाबाभाई यांनीच पुढाकार घेत ते दोघे भाऊ आणि या दोघी बहीणी यांचे लग्न एकत्रच करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याला दोन्ही घरांतून मान्यता मिळाली.

अलीकडेच बोधेगावमध्ये हे लग्न झाले. करोनाचे नियम पाळून झालेल्या या सोहळ्यात अर्थातच मामा म्हणून बाबाभाईच होते. आपल्या भाच्यांचे लग्न लावावे, तशाच पद्धतीने त्यांनी यात भाग घेतला. लग्नात तरी आपले वडील असावेत, ही मुलींची इच्छासुद्धा त्यांनी पूर्ण केली. मुलींच्या वडिलांची समजूत काढून त्यांना लग्नापुरते बोलावून आणले. पाठवणीपर्यंतचे सर्व विधी बाबाभाईंनी मामा या नात्याने पार पाडले. सासरी निघालेल्या दोन्ही मुलींनी शेवटी या दिलदार मामाच्या गळ्यात पडूनच आपल्या भावानांना वाट मोकळी करून दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here