मुंबई: आताच्या काळात शिवसेना पक्षात अधिक लोकशाही आली असेल. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी उद्धव ठाकरे हे ज्यांना पक्ष सोडून जायचा आहे, त्यांनी जा, असे सांगत होते. मात्र, मी ज्यावेळी बंड करुन शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आताच्या बंडाशी त्याची तुलना होऊ शकत नाही. शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर तेव्हा मला प्रखर विरोधाचा सामना करावा लागला होता. मी जाईन तिथे दगडफेक व्हायची, अशी आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सांगितली. ‘मटा कॅफे’च्या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांनी त्यांच्या शिवसेनेतील बंडानंतर मुंबईत कशाप्रकारची परिस्थिती होती, याच्या आठवणी जागवल्या.

छगन भुजबळ यांनी मुलाखतीत बोलताना सांगितले की, तेव्हा शिवसेनेत फक्त जायचा रस्ता होता, बाहेर यायचा रस्ता नव्हता. शिवसेना पक्षातून बाहेर पडायचं म्हणजे जीवाची जोखीम होती. मी नागपूरमध्ये असताना शिवसेनेविरोधात बंड पुकारले. त्यानंतर मी नागपुरहून मुंबईत आलो. मी सांताक्रुझ विमानतळावर उतरलो तिथपासून ते माझगावला जाईपर्यंत रस्त्यांवर काचांचा खच पसरला होता. मी त्याकाळी कुठेही गेलो की, बाटल्या, दगडांचा मारा होत असे. मला आठवतं, मी काँग्रेसमध्ये असताना घाटकोपरला मिटिंग होती. ती मिटींग सुरु झाल्यावर जी तुफान दगडफेक सुरु झाली, त्यामध्ये अनेकांची डोकी फुटली. मी कुठेही गेलो की, दगडफेक व्हायची अशी परिस्थिती होती. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. कदाचित शिवसेनेत अधिक लोकशाही आल्यामुळे तसे झाले असावे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

शिंदेंसोबत ४० आमदार, निवडून किती येणार? महाकठीण, अंगावर येतील म्हणत भुजबळांनी आकडा सांगितलाच

त्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडणं अत्यंत कठीण होतं. त्यानंतर मी ९१ साली ओबीसींचा मुद्दा हाती घेतला आणि महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली. मंडल कमिशनच्या मुद्द्यावरुन माझ्यात आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात दरी निर्माण झाली होती. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी असा मुद्दा घेतली की, पोटाल जात नसते. ते त्यांचं मत होतं. त्यामुळे मी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे ज्यांना गुरु मानतात ते आनंद दिघेही आम्ही पक्ष सोडला तेव्हा नागपूरला होते. त्यावेळी पहिले ३६ सह्या होत्या, मग बरोबर येताना १८ लोक आले. मग त्याची नोंद झाली. मग १८ पैकी ६ लोक परत गेले. मग आम्ही १२ जण शेवटपर्यंत राहिलो. त्यावेळी मधुकरराव चौधरी यांनी एक तृतीयांश आमदारांच्या संख्येप्रमाणे निकाल दिला, तो निकाल सर्वोच्च न्यायालयानेही उचलून धरला होता, अशी आठवण छगन भुजबळ यांनी सांगितले.

1 COMMENT

  1. I like what you guys are up too. Such intelligent work and reporting! Carry on the excellent works guys I’ve incorporated you guys to my blogroll. I think it’ll improve the value of my website 🙂

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here