एमएमआरडीएकडून सध्या मेट्रो २ ब, मेट्रो ४, मेट्रो ४ अ, मेट्रो ५, मेट्रो ६ व मेट्रो ९ या उन्नत मार्गिकांची उभारणी सुरू आहे. तर, मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या उन्नत मार्गिका पाच महिन्यांपूर्वी पूर्ण रूपात व्यावसायिकदृष्ट्या सुरू करण्यात आली. मात्र बांधकामाधीन असलेल्या मेट्रोसह मेट्रो ७ मधील काही भागात अद्यापही बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आली होती. ते काढल्याने दुतर्फा ८४.८०६ (४२ किमी एकेरी रस्ता) किलोमीटर लांबीचा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे. याद्वारे एकंदर ६० टक्के बॅरिकेड्स काढण्यात आले आहेत. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा १-१ मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाल्याचे एमएमआरडीएने म्हटले आहे.
एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, हे बॅरिकेड्स धातूच्या पत्र्याचे असून त्याद्वारे सुरक्षिततेच्यादृष्टीने रस्ता बंद करण्यात आला होता. काही ठिकाणी बॅरिकेड्स ठेवणे अपरिहार्य होते. तिथे ते रस्त्याची कमीत कमी जागा व्यापतील, अशा पद्धतीने लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा ठिकाणी ८ किमीहून अधिक लांबीचा अधिक रूंद रस्ता उपलब्ध झाला आहे. एकूण ३३५२ बॅरिकेड्सची अशा पद्धतीने कमी जागा व्यापतील, अशी पुनर्रचना करण्यात आली आहे.
‘सर्व मेट्रो प्रकल्पातील काम पूर्ण झालेल्या ठिकाणांचे बॅरिकेड्स काढून रस्ते पूर्वस्थितीत खुले झाले आहेत. अनेक महत्त्वाच्या रस्त्याचा भाग मोकळा झाल्याने मान्सूनकाळात नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दर १५ दिवसांनी मेट्रोच्या कामाचा आणि बॅरिकेड्सचा आढावा घेतला जाईल. एखाद्या ठिकाणी काम संपले की लगेचच तो रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला जाईल’, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.
मोकळे झालेले प्रमुख रस्ते असे
मेट्रो मार्ग २ब (अंधेरी-मानखुर्द)
गुलमोहर रोड (जुहू सर्कल ते मिठीबाई महाविद्यालय) : १.७६७ किमी
एस.व्ही. रोड (विले पार्ले जंक्शन ते मिलन सबवे) : १.०५७ किमी
बी.के.सी रोड (कलानगर ते एमटीएनएल) : १.५३६ किमी
व्ही.एन. पूर्व मार्ग (डायमंड गार्डन ते बीएआरसी उड्डाणपूल) : १.४०८ किमी
सायन- पनवेल महामार्ग (बीएआरसी ते मानखुर्द उड्डाणपूल) : १.४५९ किमी
मेट्रो मार्ग ४आणि ४अ (ठाणे-वडाळा)
९० फूट रोड ३.९९० किमी
एलबीएस मार्ग (वेगवेगळ्या तीन ठिकाणी) : १५ किमी
पूर्व द्रुतगती मार्ग : ४.७२६ किमी
घोडबंदर रोड (वेगवेगळ्या दोन ठिकाणी) : ४ किमी
डेपो रोड : १.१५४किमी
मेट्रो मार्ग ५ (कल्याण-ठाणे)
कापूरबावडी ते बाळकुम नाका : १.५५३ किमी
बाळकुम नाका ते अंजूरफाटा : ७.५७३ किमी
अंजूरफाटा ते धामणकर नाका : २.०३३ किमी
मेट्रो मार्ग ६ (जोगेश्वरी-विक्रोळी)
जेव्हीएलआर
(पश्चिम द्रुतगती मार्ग जंक्शन ते महाकाली लेणी) : ४.३० किमी
(महाकाली लेणी ते पवई तलाव) : ४.१९किमी
(पवई तलाव- विक्रोळी – कांजूर मार्ग) : ६.५ किमी
मेट्रो मार्ग ९ (दहिसर-मिरागाव)
ओवारीपाडा जंक्शन ते दहिसर टोल : १.६४८ किमी
दहिसर टोल ते डेल्टा : १.७१० किमी