‘मान्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गातील काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे,’ असं हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, मुंबई आणि लगतच्या परिसराला पाऊस झोडपून काढत असताना मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. त्यामुळे बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागून आहेत.
महाबळेश्वरला जोरदार पाऊस
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कोयना, नवजाला पाच दिवसांपासून पाऊस सुरू असून, महाबळेश्वरला २४ तासांत ११८ मिलीमीटरची पर्जन्यमानाची नोंद झाली. यामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. पूर्व भागात खरीप हंगामातील पेरणीसाठी पावसाची आवश्यकता आहे.
गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडू लागला आहे. विशेषतः पश्चिम भागातील कोयना, नवजा, तापोळा, बामणोली, महाबळेश्वरसह कांदाटी खोल्यात सतत पाऊस पडत आहे. यामुळे ओढे, नाले, भात खाचरे भरून पाणी वाहत आहे. कोयना, धोम बलकवडी, उरमोडी आदी प्रमुख धरण परिसरातही पावसाचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठाही हळूहळू वाढू लागला आहे.
गुरुवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ११.१६ टीएमसी पाणीसाठा झाला होता. त्याचबरोबर धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडत असला, तरी पूर्वेकडे दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाज
मान्सून सध्या देशात सक्रिय असून, देशाच्या बहुतेक भागांत तो पोहोचला आहे, अशी माहिती हवामानशास्त्र विभागाच्या वतीने गुरुवारी देण्यात आली. येत्या काही दिवसांत अनेक राज्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत दक्षिण गुजरात, कोकण आणि गोव्यात २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस अपेक्षित आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशातही १२० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पावसाच्या सरी झेलत विठोबाचा रथ सोहळा
वारकऱ्यांची प्रचंड गर्दी, भक्तीचा उत्साह व पावसाच्या सरींमध्ये विठोबाचा रथ सोहळा पार पडला. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने या रथाचे दर्शन घेऊन खारीक व बुक्का उधळला. आषाढी एकादशीला पंढरपुरातील सरदार खासगीवाले यांच्या वतीने रथ काढण्याची परंपरा आहे. जवळपास अडीचशे वर्षांपासून ही परंपरा सुरू असून, सध्या माहेश्वरी धर्मशाळेतून हा रथोत्सव निघतो. आषाढी व कार्तिकी एकादशीस लाखो भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात; परंतु सर्वच भक्तांना एकादशीला देवाचे दर्शन घेता येत नाही. यामुळे देवच आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी राही, रखुमाईसह रथातून नगरप्रदक्षिणा करतो, अशी या रथोत्सवामागे आख्यायिका आहे. वीस फूट उंच असलेला हा रथ लाकडी असून, तो हाताने ओढत नेला जातो.