मोदी यांनी याआधी विविध क्षेत्रांतील दिग्गजांसोबत जवळपास डझनभर बैठका घेतल्या आहेत. अर्थव्यवस्थेला मारक ठरणाऱ्या विविध मुद्द्यांसह आगामी अर्थसंकल्पात प्रभावी योजना आणण्यासंदर्भात चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे. मोदी यांनी गुरुवारी, अर्थतज्ज्ञ, विविध क्षेत्रांतील विशेषज्ञ आणि यशस्वी युवा उद्योजकांसोबत सल्लामसलत केली. २०२४पर्यंत ५ हजार अब्ज डॉलरपर्यंत नेण्याच्या दिशेनं एकत्रित येऊन प्रयत्न करावेत, असं आवाहन त्यांनी केलं.
‘एक राष्ट्र म्हणून विचार करण्याची गरज’
‘आपल्याला एकत्र येऊन काम करण्याची आणि एक राष्ट्र म्हणून विचार करण्यास सुरुवात केली पाहिजे,’ असं मोदी म्हणाले. भारतीय अर्थव्यवस्थेच्या चढ-उतार झेलण्याच्या ताकदीतून अर्थव्यवस्थेची मूलतत्वे मजबूत आहेत आणि तिच्यात पुन्हा उसळी घेण्याची क्षमता असल्याचं दिसून येतं. सर्व हितचिंतकांना वास्तव आणि विचार यातील दरी कमी करण्यासाठी काम करायचं आहे, यावरही मोदींनी भर दिला.
४० तज्ज्ञांनी बैठकीत घेतला सहभाग
सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत विविध क्षेत्रांतील ४० तज्ज्ञांनी सहभाग घेतला होता. त्यांनी सरकारकडे कर्ज वृद्धी, निर्यात वाढ, सार्वजनिक क्षेत्रांतील बँकांचे संचालन, रोजगार वाढवण्यावर लक्ष देण्याची मागणी केली. ज्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करता येईल अशा योजनांवर काम करण्याची ग्वाही मोदींनी त्यांना दिली.
आर्थिक वृद्धीशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा
पंतप्रधान यांनी आज निती आयोगामध्ये अर्थतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींसमवेत चर्चा केली. त्यात आर्थिक वृद्धी, स्टार्टअप आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. या उच्चस्तरीय बैठकीला गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times