येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाऊ नका, अशी धमकी ब्राह्मण महासंघाने संमेलनाचे उद्घाटक कविवर्य यांना दिली आहे. ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ शुक्रवार १० जानेवारी पासून होत आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला आलेल्या या धमकीमुळे आयोजक चिंतेत आहेत. संमेलनाच्या अध्यक्षपदी फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्यापासून हे संमेलन वादात सापडले आहे. दरम्यान, संमेलनाला जाऊ नये अशी फोनवरून धमकी मिळाल्यानंतरही ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महानोर यांना तातडीने सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे आदेश दिले आहेत. धमकीचं पत्र आल्याची माहिती स्वत: महानोर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी पत्र दिल्याचं महानोर यांनी सांगितलं. विविध राज्यातून धमकीचे फोन येत असल्याचेही ते बोलले. ते म्हणाले, ‘१० जानेवारी रोजी सुरु होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची अध्यक्ष म्हणून फ्रान्सिस दिब्रेटो यांची निवड एकमताने करण्यात आली. ही निवड प्रक्रिया करण्याची एक पद्धत आहे तो संकेत पाळूनच ही निवड झाली आहे. यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काहीही नाही,हे सगळं मी त्यांना समजावून सांगितलं मात्र तरीही त्यांनी तुम्ही साहित्य संमेलनाला जाऊ नका असं मला बजावलं आहे.’
पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिब्रिटो यांचं नाव अध्यक्षपदासाठी सुचवलं होतं. त्यानंतर 93 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली होती. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं साहित्य ख्रिस्ती धर्मावर आधारित आहे. मराठी साहित्यात दिब्रिटो यांचे योगदान नाही, असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांतर्फे सातत्याने करण्यात येत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times