म. टा. वृत्तसेवा, मंचर/जुन्नर : समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात निरगुडसर येथील शिक्षक कैलास गंगावणे (वय ४८), पत्नी कांचन गंगावणे (वय ३८) आणि मुलगी सई गंगावणे (वय २०) या तिघांचाही मृत्यू झाला. त्यामुळे निरगुडसरवर शोककळा पसरली.

गंगावणे यांचा मुलगा आदित्य याला नागपूरमधील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. त्याला महाविद्यालयात सोडून हे कुटुंबीय परतीच्या दिशेने निघाले होते. या प्रवासात त्यांच्यावर काळाने घाला घातला. सई गंगावणे ही अतिशय हुशार विद्यार्थिनी होती. तिला तिच्या गुणवत्तेवर आयुर्वेदिक महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता.

परिणीतचा सोन्यासारखा संसार जळून खाक झाला; बुलढाणा अपघातात पुण्यातील कुटुंब क्षणात संपलं; रहिवाशांचा हंबरडा
विद्यार्थ्यांनी फोडला हंबरडा

गंगावणे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे वास्तव्यास होते. प्रा. कैलास गंगावणे निरगुडसर येथील (ता. आंबेगाव) पं. जवाहर नेहरू विद्यालयात इंग्रजीचे शिक्षक होते. या घटनेची माहिती समजताच विद्यालयातील मुलांनी व सहकारी शिक्षकांनी एकच हंबरडा फोडला. मूळचे शिरूर तालुक्यातील गंगावणे अतिशय मनमिळावू होते. ‘आम्ही पोरके झालो आहोत,’ असे त्यांच्यासोबत काम करणारे प्रा. अरुण गोरडे यांनी सांगितले.

‘विद्यालयात व विद्यार्थ्यांत प्रा. गंगावणे लोकप्रिय होते. त्यांच्या जाण्याने गावात मोठी पोकळी निर्माण झाली असून, एक लोकप्रिय शिक्षक आम्ही गमावला आहे,’ असे निरगुडेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले.

…ते बोलणे ठरले शेवटचे

जुन्नर : बस अपघातात आई-वडिलांसह बहीण गमावलेल्या आदित्य गंगावणे याचे रात्री साडेदहा वाजता कुटुंबाशी झालेले बोलणे शेवटचे ठरले. आदित्यची मावशी प्रा. सुप्रिया काळे या जुन्नरच्या शिवछत्रपती महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागात कार्यरत आहेत. त्यांनी सकाळी टीव्हीवरील बातम्यांत समृद्धी महामार्गावर झालेल्या बस अपघाताची बातमी पाहिली. यामुळे त्या अस्वस्थ झाल्या. बहिणीसह तिचे कुटुंब नागपूरवरून पुण्याकडच्या परतीच्या प्रवासात असल्याने ते कुठपर्यंत आले, हे विचारण्यासाठी त्यांनी फोन लावला; पण तिघांचाही फोन बंद होता. यामुळे त्यांनी आदित्यला फोन लावला. त्या वेळी आदित्यनेही रात्री बस जेवायला थांबली होती तेव्हा मी आई, वडिलांशी बोललो होतो, असे सांगितले. मावशीच्या अशा विचारण्याने तोही अस्वस्थ झाला. त्यानंतर बातम्या पाहिल्या आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

पैसे पाठवायचे होते त्याला; बुलढाणा अपघातात निखिल पाथेचा दुर्दैवी मृत्यू, भावाला हुंदका आवरेना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here