‘पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये घडलेल्या थरारक घटनेत, माथेफिरूच्या हल्ल्यातून एका तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या धाडसी तरुणांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची आज मातोश्रीवर भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी या तरुणांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली’ असे ट्वीट उद्धव ठाकरे यांच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आले आहे. यासोबत दोघांच्या सत्काराचा फोटोही जोडण्यात आला आहे.
महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांनी ज्यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, साधारण त्याच वेळी म्हणजे दुपारी २ वाजून ४२ मिनिटांनी उद्धव ठाकरेंच्या सोशल मीडियावरुन हे ट्वीट करण्यात आलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात ठीक एक वर्षांनी राजकीय भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या सरकारला एक वर्ष पूर्ण होऊन काही तास उलटत नाहीत, तोच अजित पवार समर्थक आमदारांसह सत्तेत सहभागी झाल्याचं वृत्त समोर आलं. हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
अजित पवार यांच्यासह धनंजय मुंडे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील या दिग्गज नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. याशिवाय अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील, धर्मरावबाबा अत्राम यांचाही मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ३० आमदारांचा सत्तेत समावेश होणार असल्याची माहिती आहे.