पक्षात ज्या प्रकारे फूट पडली आहे, त्यावरून ही बंडखोरी दिसून येत आहे. मागच्या वेळीही अजित पवारांनी अनेक आमदारांना सोबत घेतलं होतं. त्यावेळी अजित पवार आणि आमदारांना परत आणण्यासाठी शरद पवारांना खूप प्रयत्न करावे लागले होते. खूप प्रयत्नानंतर गुरुग्रामला गेलेले आमदार पक्षात परतले होते. मात्र आता या वेळी शरद पवार हे आव्हान कसं पेलतात हे पाहावं लागेल.
५३ मधील १८ आमदार फोडले!
ज्या प्रकारे अजित पवार यांच्यासोबत १८ आमदार राजभवनात पोहोचले त्यावरून राष्ट्रवादीत सर्व काही ठीक नाही हेच स्पष्ट होतं. पण आता राष्ट्रवादीत बंडखोरी झाली तर महाविकास आघाडीचं काय होणार, असा प्रश्न आता उपस्थित होतो. इतकंच नाहीतर जे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करून आले त्या नेत्यांचं काय होणार? हा देखील मोठा प्रश्न आहे. आता महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) टिकले आहेत. एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण शिवसेनेला सोबत घेत दुसरा मोठा पक्ष स्थापन केला. असंच आव्हान शरद पवारांसमोर उभं ठाकणार आहे. महाराष्ट्राचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीचे ४० हून अधिक आमदार सरकारसोबत असल्याचा दावा केला आहे. असं असेल तर राष्ट्रवादीची अवस्था शिवसेनेसारखी होईल का? असा प्रश्न आहे.
विरोधी एकजुटीला धक्का…
पाटण्यातील विरोधी एकजुटीच्या बैठकीला राष्ट्रवादीचे सुप्रिमो पोहोचले होते. यामध्ये त्यांच्यासोबत त्यांची कन्या सुप्रिया सुळेही गेल्या होत्या. विरोधी एकजुटीची कसरत आणि मोदींविरोधात मोर्चेबांधणीचे प्रयत्न सुरू असताना अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फोडलं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतही निश्चितच याचा फरक पडेल. दरम्यान, महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत.
१७ जूनला कौतुक अन् २ जुलैला बंड…
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी १७ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं कौतुक केलं होतं. यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी हे नेहरू आणि इंदिरांसारखे चमकणारे नेते असल्याचे त्यांनी म्हटले होतं. त्यांच्या कामामुळे भाजप सत्तेत आहे, असंही अजित पवार म्हणाले होते. अजित पवार यांनी एप्रिलमध्ये पंतप्रधानांचे कौतुक केलं होतं.