एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे अजित पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या ताब्यात घेण्याची तयारी केली असल्याची चर्चा रंगली आहे. त्यासाठी अजित पवार हे एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल टाकताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारल्यानंतर खरी शिवसेना आमचीच असल्याचे सांगत बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा जाणीवपूर्वक आणि ठसठशीतपणे वापर केला होता. त्यामुळे सामान्य शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. आता अजित पवारही एकनाथ शिंदेंच्या पावलावर पाऊल टाकताना दिसत आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या समर्थकांना बॅनर्स लावताना त्यावर शरद पवार यांचा फोटो ठळकपणे लावावा, अशा सूचना दिल्या होत्या. ही गोष्ट लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांचा फोटो वापरण्यावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे अजित पवार यांच्या गटाने बॅनर्सवर शरद पवार यांचा फोटो वापरण्याचा निर्णय रद्द केला. त्याऐवजी आता अजितदादांच्या गटाला बॅनर्सवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचा फोटो वापरावा, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.
अजित पवारांचे बंड, चर्चा मात्र जुन्नरच्या आमदारांची पोस्टची
राज्याच्या राजकारणात रविवार दि. २ जुलै हा दिवस न विसरता येणारा आहे. कारण राष्ट्रवादीचे प्रमुख नेत्यांनी शरद पवार यांच्या विरोधात जात बंड करून शिंदे – फडणवीस सरकारमध्ये ते सामील झाले आहे. त्यात अजित पवार यांच्या सह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. त्यात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली आहे. अजित पवार यांचा गट जरी बाहेर पडला असला तरी काही आमदार मात्र शरद पवार यांच्या सोबत राहणे पसंत केले आहे. त्यात जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांची पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे जुन्नरचे राजकारण आता चर्चेत आले आहे.
अजित पवारांनी बंड केल्यानंतर जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, ” राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब आहे. शरदचंद्रजी पवार साहेब व अजित दादा पवार हे आमचे नेते आहेत. या कुटुंबातील मी एक अतिशय छोटा घटक आहे. सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी एकत्र राहावं अशी माझी भूमिका आहे. जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ, तरुण कार्यकर्ते, सहकारी व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून . पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल. अशा आयश्याची पोस्ट करत अतुल बेनके यांनी तटस्थ भूमिका घेणे पसंत केल्याचे पहायला मिळत आहे.
जुन्नर तालुक्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार वल्लभशेठ बेनके हे शरद पवार यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. पवार साहेबांच्या प्रत्येक भूमिकेला त्यांचे समर्थन असते. वल्लभ बेनके यांच्या नंतर आता त्यांचा मुलगा आमदार अतुल बेनके यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केल्याचे पहायला मिळत आहे.