मागील आठवड्यात श्रीगोंदा तालुक्यातून सुरेश नामक तरुणाने जळगावातील नरेश याला फोन केला होता. खोदकामातून सोने सापडले आहे. हे सोन स्वस्तात देण्याचे आमिष त्याने दाखवले. सोने हवे असल्यास श्रीगोंदा येथे या असा निरोप दिला. यानंतर नरेश उर्फ बाळा जगदीश सोनवणे (वय २२), प्रेमराज रमेश पाटील (२२), योगेश मोहन ठाकुर (२२), कल्पना किशाेर सपकाळे (४०) व आशाबाई जगदीश सोनवणे (४२, सर्व रा.हरी विठ्ठलनगर) या सर्वांनी तीन लाख रुपये गोळा केले. खासगी वाहनाने श्रीगोंदा तालुका गाठला.
सुरेश याला फोन करुन पैसे आणल्याची माहिती दिली. त्याने पैसे घेऊन या सर्वांना विसापूर फाट्यावर बोलावले. घटनास्थळावर दबा धरून बसलेले चव्हाण बंधू व इतर दोघांनी पैशांची बॅग हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे तेथे दोन गटांत हाणामारी सुरू झाली. यातूनच जळगावातून गेलेल्या पाचही जणांनी चाकूने वार करीत नातीक कुंजीलाल चव्हाण (वय ४०),श्रीधर कुंजीलाल चव्हाण (३५), नागेश कुंजीलाल चव्हाण (सर्व ४०, रा.सुरेगाव, ता. श्रीगोंदा) व लिंब्या हाबऱ्या काळे (वय २२, रा.देऊनगाव सिद्धी, ता.अहमदनगर) या चौघांचा खून केला. यानंतर संशयित जळगावात पळून आले होते. हाणामारीत एक जणाचे एटीएम कार्ड घटनास्थळी पडले होते. एटीएम कार्ड मिळाल्यानंतर तांत्रिक माहिती घेतली असता हे कार्ड जळगावातील असल्याचे समोर आले. त्यानुसार नगर पोलिसांनी २१ ऑगस्ट रोजी जळगाव गाठले. येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या मदतीने पाचही जणांना ताब्यात घेऊन नगर येथे नेले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times