शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या सांगण्यानुसार अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या अनेक आमदारांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. काही आमदारांना आपण कशावर सह्या करत आहोत, हेदेखील सांगण्यात आले नाही, असा दावा जयंत पाटील यांनी केला होता. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत हे आमदार माघारी परततील, अशी शक्यता शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडून वर्तविण्यात आली होती. शरद पवार यांनी अजित पवार यांच्या भूमिकेला विरोध करत पक्ष बांधण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्धार व्यक्त केला होता. तेव्हापासून अजितदादांसोबत शपथविधीला उपस्थित असणाऱ्या आमदारांमध्ये चलबिचल सुरु झाल्याचे दिसत आहे. शहापूरचे आमदार दौलत दरोडा आणि वाईचे आमदार मकरंद पाटील हे दोघे काल राजभवनात शपथविधीला उपस्थित होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी या आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
दौलत दरोडा यांनी आपल्याला राजभवनावर बैठकीसाठी बोलावण्यात आल्याचे सांगितले. आमच्याकडून सह्या घेण्यात आल्या. मात्र, माझा पाठिंबा हा शरद पवार यांनाच आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असलेल्या सरकारमध्ये आम्ही सहभागी होऊ शकत नाही, असे दौलत दरोडा यांनी म्हटले. तर दुसरीकडे शपथविधीला उपस्थित असणारे मकरंद पाटील हे सोमवारी कराडमध्ये दिसून आले. शरद पवार हे कराडमधील यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ असलेल्या प्रीतीसंगमावर आले होते. यावेळी मकरंद पाटील हे शरद पवार यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. यानंतर ते शरद पवारांसोबत गाडीत बसून पुढे रवाना झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेमके किती आमदार अजित पवार यांच्या पाठिशी आहेत, याबाबत संभ्रम आहे. अजित पवार यांनी आपल्या पाठिशी बहुतांश पक्ष असल्याचा दावा केला असला तरी त्यांना पाठिंबा असलेल्या आमदारांचा आकडा त्यांनी सांगितला नव्हता. तर जयंत पाटील यांनीही अजितदादांसोबत गेलेले अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हटले होते. अजित पवार यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या केवळ ९ आमदारांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे आमची संख्या फक्त ९ ने कमी झाली आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला होता.