साताराः जावली तालुक्यातील साखळी तोडण्यामध्ये शासकीय यंत्रणा अपयशी ठरत असताना मेढा नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांनी संशयित रुग्णांना रायगावला ने -आण करण्यासाठी एकाच गाडीत बसवल्यानं जनतेत असंतोष पसरला असून जिल्हाधिकार्‍यांनी चौकशी लावून मुख्याधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मेढा नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये करोना रुग्ण सापडत असताना त्या करोना बाधितांच्या संपर्कात येणार्‍या लोकांच्या याद्या बनविल्या गेल्या. त्या संशयितांना रायगाव येथे तपासणी करण्यासाठी नेण्यात आले; परंतु त्या संशयितांना नेताना व परत आणताना गाडीमध्ये कोंबण्यात आले. यामध्ये दोन गरोदर महिला असताना गाडीमध्ये एकही डॉक्टर नव्हता. संबंधित बस ही एका शाळेची बस असून कमी ट्रीप जादा पैसे कमविण्याचा प्रयत्न करतेय की, काय असा प्रश्‍न केला जात आहे. यामध्ये भ्रष्टाचार तर नाही ना याची चौकशी व्हावी.

एस.टी.ने प्रवास करताना एका सीटवर एकच व्यक्ती हा आदेश जिल्हाधिकार्‍यांचा असताना कोरोना संशयितांचा वडाप पद्धतीने प्रवास कसा केला जातो असा प्रश्‍न निर्माण होत आहे. मुख्याधिकारी यांच्या ढिसाळ नियोजनामुळे करोना संशयितांना वडापसारखा प्रवास करावा लागला. एकीकडे करोना रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मुख्याधिकारी जनतेच्या जिवाशी खेळताना दिसत आहेत.

‘हम करे सो कायदा’ अशा दिमाखात वावरत असलेल्या मुख्याधिकार्‍यांनी करोनाबाबत कोणत्याही उपाययोजना न केल्यामुळे जनतेत नाराजी पसरली आहे. कागदी घोडे नाचवण्यात पटाईत असलेले मुख्याधिकारी काढलेल्या अंमलबजावणीच्या कायद्याचीच पायमल्ली करताना दिसत आहेत.

सध्या मेढा करोनाच्या हॉटस्पॉटकडे वाटचाल करताना दिसत आहे. करोना बाधितांच्या संपर्कातील लोकांना मेंढरासारखी वागणूक दिली जात असल्याने करोना हटाव मोहीम आहे की करोना बचाव मोहीम आहे हेच लक्षात येत नसल्याने जिल्हाधिकार्‍यांनी याकडे लक्ष देण्याची व मुख्याधिकार्‍यांची चौकशी करण्याची मागणी जनता करत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here