ठाणे: करोनाबाधितांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारणाऱ्या कल्याणच्या श्रीदेवी रुग्णालयाला कल्याण-डोंबिवली पालिकेने दणका दिला आहे. या रुग्णालयाचा परवाना पालिकेने रद्द केला आहे. अनेक करोनाबाधितांच्या तक्रारी आल्यानंतर अखेर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रवक्त्या माधुरी फोफळे यांनी ही माहिती दिली. करोना रुग्णांकडून मनमानीपणे बिल वसूल करून सरकारच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे. पालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या आदेशानंतर अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी शनिवारी ही कारवाई केली. ३१ ऑगस्ट किंवा रुग्णालयाला पुढील सूचना मिळत नाही तोपर्यंत श्रीदेवी रुग्णालयाचा परवाना रद्द राहणार असल्याचं पालिकेने स्पष्ट केलं आहे.

पालिकेच्या ऑर्डर नुसार रुग्णालयातील होमोडायलिसीस सुविधा सुरू राहिल. मात्र नव्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेता येणार नाही. त्याशिवाय केडीएमसीचे वैद्यकीय अधिकारी समीर सरवणकर यांची या रुग्णालयावर तात्काळ प्रभावाने प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या रुग्णालयातील कारभारावर लक्ष ठेवतानाच सरकारच्या नियमांचे पालन केले जाते की नाही, यावर सरवणकर लक्ष ठेवणार असल्याचं आदेशात म्हटलं आहे. करोना रुग्णांकडून अनेक रुग्णालये मनमानी शुल्क वसुली करत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे काही रुग्णालयांना नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या. तसेच भरारी पथकांद्वारे रुग्णालयांवर धाडीही मारण्यात आल्या होत्या. अनेक रुग्णालयांनी तर जुलैमधील कोविड रुग्णांसाठी किती खाटा रुग्णालयात ठेवल्या होत्या. याची रुग्णालयाने पालिकेला माहितीच दिली नव्हती. त्यामुळे पालिकेला कठोर पावलं उचलावी लागल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं.

दरम्यान, कल्याण पालिका क्षेत्रात शुक्रवारी ४२४ नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे पालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या २५,९८४ झाली आहे. मागील २४ तासांत ३७१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने करोनामुक्त रुग्णांचा आकडा २२,२७८ झाला आहे. अद्याप ३१६८ रुग्ण विविध रुग्णालये, विलगीकरण केंद्रांत उपचार घेत आहेत. तर करोनाची लागण झालेल्या आणखी आठ जणांनी जीव गमावल्याने करोना बळींची संख्या ५३८ झाली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here