वॉशिंग्टन: इराणमधून १७६ प्रवाशांना घेऊन जाणारे युक्रेनचे विमान इराणनेच पाडल्याची शक्यता अमेरिकन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही अशाच प्रकारचा संशय व्यक्त केला आहे. दुसरीकडे अमेरिकेच्या म्हणण्याला पुष्टी मिळू लागली असून कॅनडा आणि ब्रिटननेही इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनचे विमान कोसळल्याची माहिती गुप्तचरांच्या माध्यमातून मिळत असल्याचे म्हटले आहे. हे क्षेपणास्त्र चुकून डागण्यात आले असावे, असेही या दोन्ही देशांचे म्हणणे आहे. दरम्यान, इराणची राजधानी तेहरानमधील विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर युक्रेनचे विमान लगेचच कोसळले होते. त्यात विमानातील सर्व १७६ प्रवासी मृत्युमुखी पडले होते. मंगळवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली होती. आता हा अपघात नव्हता तर विमान पाडण्यात आले होते, अशी माहिती पुढे येत असल्याने इराणची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेवर अगदी स्पष्टपणे संशय घेतला आहे. इराणमधील विमान दुर्घटनेबाबत माझ्या मनात शंका आहे, असे ट्रम्प म्हणाले. हे विमान इराणने पाडले असा थेट आरोप मात्र त्यांनी केला नाही. या विमान दुर्घटनेशी अमेरिकेचा कोणताही संबंध नाही, असे मात्र त्यांनी आवर्जून नमूद केले.

अमेरिकेनंतर कॅनडानेही या दुर्घटनेमागे इराणचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडू यांनी याबाबत धक्कादायक दावा केला. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनचे विमान कोसळले, अशी माहिती आम्हाला गुप्तचरांकडून मिळाली आहे, असे ट्रूडू म्हणाले. हे क्षेपणास्त्र चुकून डागण्यात आले असावे, असेही ट्रूडू यांनी पुढे नमूद केले. ब्रिटननेही हाच सूर आळवला आहे. इराणने मात्र हा दावा फेटाळला असून गुप्तचरांचा अहवाल कॅनडाने आम्हाला द्यावा, असे आवाहन इराणने केले आहे.

दरम्यान, इराणमधील विमान दुर्घटनेच्या चौकशीसाठी युक्रेनने संयुक्त राष्ट्रांकडे मदत मागितली आहे. या चौकशीत बिनशर्त सहकार्य मिळावे, अशी विनंती युक्रेनने संयुक्त राष्ट्रांकडे केल्याचे एका युक्रेनी मंत्र्याने सांगितले.

संशय आधीपासूनच

अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष पेटला असतानाच इराणमध्ये विमान दुर्घटना घडल्याने सुरुवातीपासूनच त्याकडे संशयाने पाहिले जात होते. मुख्य म्हणजे इराणने इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला करत २२ क्षेपणास्त्रे डागल्यानंतर अवघ्या काही तासांनंतरच ही विमान दुर्घटना घडली होती. आता इराणच्या क्षेपणास्त्रांच्या माऱ्यात हे विमान कोसळल्याची शक्यता बळावत असल्याने नवे वादळ उठण्याची चिन्हे आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here