म. टा. प्रतिनिधी, पुणे: करोनाचे संकट लक्षात घेऊन यंदा पुणेकरांनी घरच्या घरीच विसर्जन करत दीड दिवसाच्या बाप्पाला जड अंतः करणाने निरोप दिला. शहरातील नदीलगत असलेल्या विसर्जन घाटांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त असल्याने विसर्जनासाठी घाटावर आलेल्या नागरिकांना पुन्हा घरी जाऊन विसर्जन करावे लागले. अनेकांनी फिरत्या हौदात विसर्जन केले तर काहींनी मूर्ती दान करण्याचे औदार्य दाखवत प्रशासनाला सहकार्य केले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा घाटावर विसर्जन करता येणार नाही, असे यापूर्वीच प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. बहुतांश नागरिकांनी घरच्याघरीच विसर्जन करत बाप्पाला निरोप दिला. काही जणांनी फिरत्या हौदात विसर्जनाचे सोपस्कार पार पाडले. प्रशासनाच्या नियमांना डावलून काही नागरिक नदीत गणपती विसर्जनासाठी आले होते त्यांना पोलिसांनी विनंती करून पुन्हा माघारी धाडले. तरीही काही नागरिक पोलिसांशी वाद घालताना दिसून आले.

महापालिका प्रशासनातर्फे प्रत्येक विसर्जन घाटावर आणि क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील पालिका कार्यालयांमध्ये अमोनिअम बायकार्बोनेटच्या पुड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांनी या पुड्या मोठ्याप्रमाणावर घरी नेत गणेश विसर्जनासाठी त्याचा वापर केला.

मनोभावे गणेशाची पूजा करून घरोघरी विसर्जनाची प्रक्रिया पार पडली. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पोलीस आणि महापालिका प्रशासनाला बहुतांश नागरिक सहकार्य करीत असल्याचे पहायला मिळाले. घरी विसर्जन शक्य नाही अशा अनेक नागरिकांनी फिरते हौद वाढवण्याची मागणी केली. फिरते हौद दिसलेच नाहीत तर विसर्जन करायचे कसे, असा प्रश्नही यावेळी अनेकांनी उपस्थित केला. बऱ्याच वर्षांनी गणेशोत्सवात पुण्यातील विसर्जन घाटावर बाप्पाला निरोप देताना केली जाणारी आरती आणि मोरयाचा जयघोष यंदा मात्र अनुभवायला मिळाला नाही.

पोलिसांपुढे पाचव्या आणि सातव्या दिवसाचे आव्हान

शहरात पाचव्या आणि सातव्या दिवशी बहुतांश घरगुती गणपतींचे विसर्जन केले जाते. या दोन दिवशी विसर्जन घाटावर तुफान गर्दी होते. दीड दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी पोलिसांना फारशी कसरत करावी लागली नसली तरी पाचव्या आणि सातव्या दिवशी घाटावर येणाऱ्या नागरिकांची गर्दी कशी टाळायची, हे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

घाटावर कोणत्याही परिस्थितीत येऊ नका

नागरिकांनी विसर्जन करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विसर्जन घाटावर गर्दी करू नये, अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करत घरच्याघरीच विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गर्दी झाल्यास नागरिकांना मोठ्या धोक्याला सामोरे जावे लागेल, असे सांगत पुढील काही दिवसात याबाबत जनजागृती केली जाईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here