म.टा.प्रतिनिधी, नगरः करोनामुळे नगरमध्ये मृत्यूदर वाढत असल्याने अमरधाम मधील आणखी एक विद्युत दाहिनी सुरू करा, अशी मागणीच शिवसेनेने केली आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी अमरधाम येथील ओट्यांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे दोन-दोन दिवस अंत्यविधीस वेळ लागत असून मृतदेहाची विटंबना होत आहे, असा दावाही शिवसेनेने केला आहे. याबाबतचे निवेदनही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना दिले आहे.

नगरच्या अमरधाम येथे एक विद्युत दाहिनी असून आणखी एका विद्युत दाहिनीचे काम सुरू आहे. या विद्युत दाहिनीचे काम लवकर करून ती सुरू करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज अमरधाम येथे जाऊन तेथील दुरवस्थेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले आहे. गेल्या तीन महिन्यापासून करोनामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यूदर वाढत आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यास येथील अमरधाम येथील ओट्याची संख्या कमी पडत आहे. तसेच विद्युत दाहिनी मधील बिघाडामुळे मोठा अडथळा निर्माण होत आहे. दोन-दोन दिवस अंत्यविधीस वेळ लागत आहे. त्यामुळे मृतदेहाची विटंबना होत असून नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण होत आहे. तरी नादुरुस्त विद्युत दाहिनी तातडीने दुरुस्त करून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात यावी, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते , नगरसेवक बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, गिरीश जाधव, दत्ता जाधव, परेश लोखंडे, विशाल वालकर, मनीष गुगळे, संजय वलाकटी आदी उपस्थित होते.

याबाबत बोलताना शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते म्हणाले की, ‘अमरधाममध्ये एक विद्युत दाहिनी सुरू आहे. या विद्युतदाहिनीवर २४ तासांत जास्तीत जास्त १० अंत्यसंस्कार होऊ शकतात. तर, येथेच दुसऱ्या एका विद्युत दाहिनीचे काम संथ गतीने सुरू आहे. करोनामुळे मृतदेहांची संख्या वाढत असल्यामुळे या विद्युत दाहिनीचे काम लवकर होणे गरजेचे आहे. उद्या सायंकाळपर्यंत जर विद्युत दाहिनी सुरू झाली नाही तर आम्ही पुढील भूमिका घेऊ.’
दरम्यान, शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी काही दिवसांपूर्वीच एक शववाहिनीमध्ये बारा मृतदेह घेऊन जातानाचा प्रकार उघड केला होता. त्यातच आता विद्युत दाहिनीचा मुद्दा समोर आल्याने मनपाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here