रायपूर: एका बकऱ्याच्या डोळ्यामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो? तुमचं उत्तर कदाचित नकारार्थी असेल. पण छत्तीसगडच्या सूरजपूरमध्ये असा प्रकार घडला आहे. बकऱ्याचा डोळ्यामुळे एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला आहे. एका गावकऱ्यानं बकऱ्याचा बळी दिल्यानंतर त्याचा डोळा खाल्ला. हा डोळा त्याच्या घशात जाऊन अडकला. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यानंतर त्याचा मृत्यू झाला.घटना सूरजपूरच्या ग्राम पर्रीमध्ये घडली आहे. रामानुजनगरमधील मदनपूर गावातील ५० वर्षीय बागर साय रविवारी गावातील त्याच्या काही मित्रांसोबत प्रसिद्ध खोपा धामला पोहोचला. त्यानं देवाकडे नवस केला होता. नवस पूर्ण झाल्यानं तो खोपा धामला पोहोचला होता. तिथे त्यानं पूजा केली आणि बकऱ्याचा बळी दिला. त्यानंतर मित्रमंडळी बकऱ्याचं मांस शिजवणार होती. बागरचे मित्र मांस शिजवण्यास जात असताना त्यानं कच्चं मांस खाण्याचा मानस व्यक्त केला. मित्रांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र बागर ऐकायला तयार नव्हता. त्यानं बकऱ्याचा डोळा उचलला आणि तो मिटक्या मारत खाऊ लागला. बकऱ्याचा डोळा बागरच्या घशात अडकला. त्यानंतर बागर तडफडू लागला. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. बागरच्या मित्रांनी त्याला पाणी पिण्यास सांगितलं. मात्र त्यानं नकार दिला. बकऱ्याचा डोळा बराच वेळ घशात अडकून राहिल्यानं बागरचा श्वास गुदमरला. त्याचा मृत्यू झाला. त्यानंतरही ग्रामस्थांनी त्याला सूरजपूरच्या जिल्हा रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. बागरच्या मृत्यूबद्दल समजताच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. गावावर शोककळा पसरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here