लीलाबाई अरमकर (रा. म्हाळगीनगर) यांचा नातू शंतनू अमरकर (वय २२) याच्यासह ऋषिकेश अनिल पराळे (वय २१, रा. शुभ महालक्ष्मी सोसायटी, गिड्डोबानगर, वाठोडा), राहुल अरुण मेश्राम, (वय २२, गिड्डोबानगर), वैभव भागेश्वर वैद्य (वय २४, रा. भांडेवाडी, पारडी) व नितीन कुंभरे (वय ३१, रा. वाठोडा) या पाच तरुणांचा हिंगणा पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या मोहगाव झिल्पी येथील तलावात बडून मृत्यू झाला.
एकाचवेळी पाच कर्त्या युवकांचा मृत्यू झाल्याने पाचही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोमवारी पाचही युवकांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) शवविच्छेदन करण्यात आले. येथे पाचही युवकांच्या नातेवाइकांचा आक्रोश हृदयाला पाझर फोडत होता. त्यांच्या हुंदक्यांनी मेडिकलचा परिसरही गहिवरला.
नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, शंतनू हा रहाटे हॉस्पिटलमध्ये काम करायचा. त्याची आई प्रीती यांचे निधन झाले. वर्षभरापूर्वी वडील प्रमोद यांनाही काळाने हिरावून नेले. शंतनू हा आजी लीलाबाई यांच्यासोबत राहायचा. दोघेच एकमेकांसाठी आधार होते. दोघेही अलीकडेच नवीन घरात राहायला गेले होते. ‘आजी, मित्रांसह जात आहे, लवकरच येतो’, असे लीलाबाई यांना सांगून तो घरून निघाला, परत न येण्यासाठीच. शंतनूच्या मृत्यूने त्याचे नातेवाईक जबर धक्क्यात आहेत.
ऋषिकेश हा डॉ. प्राजक्त यांच्याकडे वाहनचालक होता. वैभवही वाहनचालक असून, अन्य दोघे खासगी काम करतात. पाचही तरुणांवर सोमवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.