मुंबईः काँग्रेसचा पक्षाध्यक्ष बदलण्याची मागणी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी यांना पत्र लिहून केली. यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचं चित्र आहे. एक म्हणजे गांधी घराण्याचे समर्थन करणारे तर दुसरा गट पक्षाला अधिक बळकट करण्याची मागणी करत आहे. यावरूनच महाराष्ट्रातील दुग्धविकासमंत्री आणि काँग्रेस नेते सुनिल केदार यांनी राज्यातील वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला आहे.

सोनिया गांधी यांना काँग्रेसमधील २३ वरिष्ठ नेत्यांनी पत्र लिहून पक्षाध्यक्ष बदलण्याची मागणी केली. त्यात मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांचाही समावेश असल्याचं बोललं जातंय. यावरून सुनिल केदार यांनी आपल्या पक्षाच्या या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. सुनिल केदार यांनी यासंदर्भात ट्विट केलंय.

संपूर्ण पक्ष सोनिया गांधी यांच्या पाठिशी आहे. तरीही गांधी घराणाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांना लाज वाटली पाहिजे. त्यांनी तातडीने या बद्दल सोनिया गांधींची माफी मागितली पाहिजे, असं सुनिल केदार यांनी एका ट्विटमध्ये म्हटलंय.

मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी सोनिया गांधींची माफी मागितली नाही तर त्यांना राज्यात काँग्रेस कार्यकर्ते कुठेही फिरकू देणार नाहीत, अशा इशारा केदार यांनी या नेत्यांना दिला.

काँग्रेसचे नेतृत्व गांधी घराण्याकडे असेल तर भाजपविरोधात लढता येईल. सोनिया गांधींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्याच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे, असं सुनिल केदार म्हणाले. केदार यांच्या या इशाऱ्यावर महाराष्ट्र काँग्रेसमधील गटबाजी समोर आली आहे.

दरम्यान, काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक उद्या होणार आहे. कार्यकारिणीची बैठक उद्या सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. या बैठकीत सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे अनेक नेत्यांनी राहुल गांधींना पुन्हा काँग्रेस अध्यक्ष करण्याची मागणी केली आहे. यामुळे काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळेल की पुन्हा पक्षाचं नेतृत्व गांधी घराण्याकडेच राहील, याकडे पक्ष कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here