पुणे येथील धनकवडीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात जिल्हा आणि तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी गारटकर बोलत होते. या बैठकीत पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी १० तालुक्यांचे अध्यक्ष बैठकीला उपस्थित होते. यात बारामती, शिरूर आणि इंदापूर या तीन तालुक्यांचे अध्यक्ष राष्ट्रवादीच्या बैठकीला अनुपस्थित होते.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बंड केल्यानंतर आता एकनाथ शिंदेप्रमाणे अजित पवार यांनी पक्ष चिन्ह आणि नावावर दावा केला आहे. यासाठी आता पक्षाचे सर्व पदाधिकारी सक्रिय झाले असून बैठकांना वेग आला आहे. शहरासह जिल्हा आणि तालुकाध्यक्षांची सकाळपासून बैठक सुरू आहे. नेमका पाठिंबा कोणाला द्यायचा हा मोठा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.
पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या नेतृत्वात आज तालुका अध्यक्षांना घेऊन बैठक पार पडली. मात्र बैठकीनंतर ही त्यांना ठोस निर्णय घेण्यात अडचण येत असून पाठिंबा कोणाला द्यायचा याचा संभ्रम अजूनही कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ते म्हणाले, “एकीकडे भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेत शरद पवार उभे आहेत तर अर्जुनाच्या भूमिकेत हे अजित पवार आहेत आणि आपली अवस्था अभिमन्यूसारखी झाली आहे. आपण एका चक्रव्युव्हात अडकलो आहोत. पण लवकरच निर्णय घेऊ”