म. टा. प्रतिनिधी, सांगलीः लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तासगावमधील श्री गणपती पंचायतन ट्रस्टच्या दीड दिवसाच्या गणेशाचे रविवारी साधेपणाने विसर्जन करण्यात आले. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रथोत्सव रद्द केल्याने यंदा पहिल्यांदाच जिपमधून श्रींची मूर्ती विसर्जनासाठी नेण्यात आली. ट्रस्टचे पदाधिकारी आणि मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. २४१ वर्षांच्या परंपरेत यंदा तिसऱ्यांदा रथोत्सव होऊ शकला नाही. यामुळे भव्य सोहळ्याला फाटा देत गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात विसर्जन झाले.

तासगावच्या गणपती मंदिरातील रथोत्सवाला २४१ वर्षांची परंपरा आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या गणेशाचे दीड दिवसात विसर्जन होते. मंदिरातून बाहेर पडणारी मूर्ती लाकडाच्या मोठ्या रथातून काशी विश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत भाविकांकडून ओढली जाते. भाविकांचा प्रचंड उत्साह, गणपती बाप्पाचा जयघोष, गुलाल, खोबरे आणि पेढ्यांची उधळण यासह ढोल-ताशांच्या गजरात होणारा रथोत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी असते. मात्र, यंदा करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टने रथोत्सव रद्द केला आहे. रविवारी दुपारी पटवर्धन वाड्यातून छबिना बाहेर पडला. मंदिरात श्रींची पूजा झाल्यानंतर संस्थानचे श्रीमंत राजेंद्र पटवर्धन, आदिती पटवर्धन यांच्यासह सर्व मानक-यांच्या उपस्थितीत मंदिरातील १२१ किलो वजनाची पंचधातूची श्रींची उत्सवमूर्ती पालखीतून मंदिराबाहेर जिपपर्यंत आणण्यात आली. जिपमध्ये उत्सवमूर्ती विराजमान झाल्यानंतर प्रथेप्रमाणे श्रींची आरती झाली. यावेळी मोजक्या मानकऱ्यांसमवेत जिप श्री काशीविशेश्वेर मंदिरापर्यंत पोहोचली. याठिकाणी पूजा करून पारंपरिक पद्धतीने विसर्जन झाले. भाविकांची गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला होता. विसर्जनासाठी वापरलेल्या जिपच्या सभोवती पोलिस तैनात होते, यामुळे भाविकांना लांबूनच श्रींचे दर्शन घ्यावे लागले. दरम्यान, सांगलीतही दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना भक्तिभावाने निरोप देण्यात आला.

तिसऱ्यांदा रद्द झाला रथोत्सव

तासगावच्या गणपती मंदिरातील रथोत्सवाला २४१ वर्षांची परंपरा आहे. या परंपरेत तीन वेळा रथोत्सव रद्द झाला. १९४२ मध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकारने रथोत्सवाला परवानगी नाकारल्याने तो होऊ शकला नाही. १९७२ मध्ये भीषण दुष्काळामुळे रथोत्सव रद्द करावा लागला. यंदा करोना संसर्गामुळे रथोत्सव रद्द करण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here