मुंबई : कोकण… शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या नेत्यांमधला कलगीतुरा इथे जोरात चालतो. अगदी राणे-तटकरे, भास्कर जाधव आणि नारायण राणे- दीपक केसरकर अशा नेत्यांमधली भांडणं सगळ्या महाराष्ट्राने पाहिली. २०१९ ला मविआ सरकार स्थापन झालं आणि राजकारणाची गणितं बदलली. सख्खे मित्र पक्के वैरी झाले आणि पक्के वैरी जीवलग मित्र झाले पण मनातली धुसपूस मात्र कायम राहिली. अशीच स्टोरी आहे सेना नेते आणि तटकरे कुटुंबाची… गोगावले मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग लावून बसले पण इकडे अजितदादांच्या सोबतीने मंत्रिपदाची शपथ घेऊन मोकळ्या झाल्या. त्यामुळे गोगावलेंची गोची झालीये. छाती बडवून मंत्री होणार असं वर्षभर गोगावले सांगत राहिले पण मागून येऊन आदिती तटकरेंनी बाजी मारली. एक भाकरी खायची होती, त्यांना अर्धी पण भाकरी मिळाली नाही. गोगावले प्रचंड नाराज आहेत. गोगावले-तटकरेंच्या संघर्षाचा इतिहास काय आहे? आणि आगामी काळातलं त्यांचं राजकारण कसं असेल? वाचा….रायगड लोकसभा मतदारसंघ… शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होते. २०१९ ला तटकरे आणि गीते यांच्यात लढत होऊन तटकरे अगदी ३ हजार मतांनी जिंकले. पुढे मविआ निर्माण झाली. नेत्यांनी परिस्थिती जुळवून घेतली. पुढे विधानसभेला श्रीवर्धन मधून आदिती तटकरे जिंकल्या, महाडमधून शिवसेनेकडून भरत गोगावले जिंकले. पुढे आदिती मंत्री झाल्या अन् यशावकाश पालकमंत्रीही झाल्या.

  • काल राजकारणात आलेली मुलगी आपल्याला वरचढ झाली, ही भरत गोगावले यांच्या मनात खंत
  • तटकरेंनी रायगडचं राजकारण गेली अनेक वर्ष केलं
  • आता आदिती वरचढ होऊ लागल्याने गोगावलेंच्या मनात इर्षा
  • नियोजन समितीच्या बैठका असो वा निधीचं वाटप गोगावले आणि आदितींमध्ये खडाजंगी व्हायची

मविआ सत्तेत असताना अजितदादा अर्थमंत्री होते, त्यावेळी अजितदादा सेना आमदारांना जास्त निधी देत नव्हते, असं कारण सांगून शिंदेंबरोबर सेनेच्या ४० आमदारांनी बंड केलं. अनेक पालकमंत्र्यांवरही शिंदे गटाच्या आमदारांचा रोष होता. त्यात रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यावर महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी आणि भरत गोगावले आणि या तीन आमदारांचा मोठा रोष होता.

  • शपथविधीच्या दिवशी गोगावलेंना राजभवनात हजर राहण्याच्या सूचना मिळाल्या
  • तिथे गेल्यावर अजितदादांचा शपथविधी संपन्न होणार असल्याचं गोगावलेंना कळलं
  • आश्चर्य म्हणजे मंत्रिपदाच्या यादीत आदितींचं नाव पाहून गोगावलेंचा चेहरा उतरला
  • मी मंत्री होणार असं ते गेली वर्षभर सांगत राहिले पण आणखी त्यांच्या नशिबी मंत्रिपदाची खुर्ची नाहीच

आपल्याला मंत्रिपद मिळेल, या आशेने गोगावलेंनी कोट शिवला. पण शिंदेंनी आणखी गोगावलेंच्या मंत्रिपदाचा विषय मार्गी लावलेला नाही. ज्या आदिती तटकरेंच्या मंत्रिपदाचा विरोध करत गोगावलेंनी ठाकरेंची साथ सोडली, त्याच आदिती तटकरेंच्या नेतृत्वात गोगावलेंना आता रायगडमध्ये काम करावे लागेल, हे नक्की…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here