समृद्धी महामार्गावरील अपघाताची घटना ताजी असतानाचा धुळे जिल्ह्यात काल मंगळवारी (दि. ४) कंटेनरच्या धडकेत दहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सात जण शिरपूर तालुक्यातील, एकजण देवपूर येथील, तर दोनजण राजस्थानातील आहेत. कंटेनरखाली चिरडले गेल्याने अपघातातील मृतांची ओळख पटविणे अवघड झाले होते. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तत्काळ शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
असा झाला अपघात
– मुंबई-आग्रा महामार्गावर मध्यप्रदेशातून धुळ्याकडे सिमेंटसाठी लागणारी खडी भरून कंटेनर जात होता.
– पुलावरून वेगाने आल्याने चालकाचे कंटेनर (आरजे ०९ जीबी ९००१) वरील नियंत्रण सुटले. कंटेनरने सर्वप्रथम एका कारला पाठीमागून धडक दिली.
– त्यानंतर पुढे चालणाऱ्या पिकअप, स्कूल बस आणि चार ते पाच दुचाकींना धडक देत कंटेनर महामार्गालगत असलेल्या हॉटेल सद्गुरूमध्ये शिरला.
– हॉटेल शेजारील बसथांब्याला धडकून कंटेनर उलटला. यावेळी चहा-नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये थांबलेले नागरिक, तसेच धुळ्याकडे निवासी आश्रमशाळेत जाण्यासाठी निघाले विद्यार्थी आणि पालक कंटेनरखाली चिरडले गेले.
पाच लाखांची मदत
अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना प्रकट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
अपघातातील मृतांची नावे
कन्हैयालाल बंजारा (कंटेनरचालक), सुरपालसिंग दिवानसिंग राजपूत (सहचालक, दोघेही रा. जावदा, जि. चितोडगड, राजस्थान), प्रतापसिंग भिमसिंग गिरासे (७०, पळासनेर, ता. शिरपूर), दशरथ कमल पावरा (२२, पळासनेर, ता. शिरपूर), गीता मुरी पावरा (१५), मुरी सुरसिंग पावरा (२८), संजय जायमय पावरा (३८), रितेश संजय पावरा (१०, सर्व रा. कोळसापाणी, ता. शिरपूर), खिरमा डेबरा कनोजे (१०, आंबापाणी, ता. शिरपूर), सुनीता राजेश खंडेलवाल (देवपूर, धुळे).