देशातील सर्वांत श्रीमंत महापालिका असलेली मुंबई महानगरपालिका गेल्या अनेक महिन्यांपासून लोकनियुक्त शासनापासून वंचित आहे. आधी करोना संकटामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या. या निवडणुका केव्हा होतील असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत हा अंदाज वर्तवला.
‘निवडणुका लवकरात लवकर झाल्या पाहिजेत, असे माझे मत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात एक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यासोबतच उद्धव ठाकरे गटाने बऱ्याच याचिका न्यायालयात दाखल केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या सर्व याचिका एकत्र करून स्टेटस-को अर्थात तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. आता जेव्हा स्थगिती हटवून सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरच निवडणुका होतील’, असेही फडणवीस म्हणाले.
‘ठाकरे गटाने याचिका मागे घ्याव्या’
‘उद्धव ठाकरे प्रत्येक वेळी विचारतात की, निवडणुका का घेत नाही? वास्तविक तुम्हीच न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्या याचिका मागे घ्या. याचिका मागे घेतल्याने स्टेटस को हटेल आणि पर्यायाने लवकर निर्णय होईल. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेता येतील. उद्धव ठाकरे आमच्यावर आरोप करतात की, तुम्ही निवडणुका घ्यायला घाबरता, पण निवडणुका घेणे आमच्या हातात नाही. माझ्या अंदाजानुसार, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये न्यायालयाचा निकाल येईल आणि त्यानंतर लगेचच निवडणुका होतील’, असेही फडणवीस म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून काय प्रतिक्रिया दिली जाते हे पाहावं लागणार आहे.