साहेब आपण वसंतदादांना सोडलं तेव्हा त्यांनाही असंच वाईट वाटलं असेल. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर मी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर बाळासाहेब आणि माँसाहेबांनाही इतकंच वाईट वाटलं असेल. तुम्ही मला तेव्हा तिकडेच थांबा, असे सांगितले नाही. तुम्ही धनजंय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणले तेव्हा गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या डोळ्यातही असेच अश्रू तरळले असतील, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. छगन भुजबळ यांच्या भाषणातील ही मांडणी पाहता अजित पवार गटाने आता कोणत्याही परिस्थितीत नमते घ्यायचे नाही, अशी भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
साहेब अजूनही काही बिघडलेले नाही. तुम्ही तुमच्याभोवतीच्या बडव्यांना बाजूला करा आम्ही सगळे तुमच्याकडे परत येऊ. तुम्ही नागालँडमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांना भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची परवानगी दिली, त्यांचा सत्कार केला. मग आमचाही सत्कार करा, आपण एकत्र सत्तेत बसू, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
शरद पवारांच्या धरसोड पद्धतीच्या राजकारणामुळे राष्ट्रवादीचे नेते तोंडघशी पडले: छगन भुजबळ
छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्या कार्यपद्धतीवर आसूड ओढले.आपण कोणासोबतही गेलो तरी विचारधारा कायम राहिली पाहिजे. धरसोड वृत्तीचे राजकारण करुन चालणार नाही. २०१९च्या निवडणुकीआधी किंवा नंतर काय बोलणी झाली होती. अजित पवार उगाच सकाळी उठून शपथ घेण्यासाठी गेले का? आपण वारंवार दिल्लीत चर्चा करायची आणि काही दिवस झाले की त्यामधून माघार घ्यायची. अशा राजकारणामुळे आपण अनेक नेत्यांना तोंडघशी पाडतो, हेदेखील लक्षात कसे येत नाही. साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, अजितदादा म्हणाले मला प्रदेशाध्यक्ष व्हायचंय. आम्हाला ना काका सांगत ना पुतण्या, निवडी जाहीर झाल्यावर समजतं, अशी खंतही यावेळी छगन भुजबळ यांनी बोलून दाखवली.
भुजबळांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल
छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लक्ष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेत तीन वर्षांनी निवडणुका झाल्या पाहिजे, असे म्हटले आहे. तुम्ही सांगता सगळ्या निवडणुका घ्या. अध्यक्षपदाची निवडणूक घ्या, फ्रंटल निवडणुका घ्या, तालुक्याच्या निवडणुका घ्या, पण प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक घेऊ नका. तुमची निवडणूक घेत नाही तर आमची निवडणूक कशाला घेता? पिरॅमिड खालून वर जाते ना. सगळ्यांना सांगता भाकऱ्या फिरवायच्या आहेत. पण मेन रोटला बसलाय तो फिरवला पाहिजे की नाही, असा सवाल विचारत छगन भुजबळ यांनी जयंत पाटील यांना लक्ष्य केले.