‘एमपीएससी’ने २०२० मध्ये घेतलेल्या पीएसआय पदाच्या परीक्षेच्या निकालाची विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. मंगळवारी विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली. निकालात छत्रपती संभाजीनगरातून सुनील खचकड हा राज्यातून पहिला आला आहे.
सुनील हा मूळचा वाशिम जिल्ह्यातील असून तो शेतकरी कुटुंबातील आहे. २०१७ पासून तो छत्रपती संभाजीनगर येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. पहिल्या दोन प्रयत्नात त्याला यशाने थोडक्यात हुलकावणी दिली होती. आता तिसऱ्या वेळी सुनीलचे पीएसआय होण्याचे स्वप्न साकार झाले आहे. त्याला ४२७ गुण आहेत.
यासह अरुण साळवे, नितीन चव्हाण, वाल्मिक मोरे, संतोष कदम, राहुल करंकाळ, नवनाथ सुरवसे, कोमल कुमावत, विशाल सवई आदी विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी यश मिळविले. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी पीएसआय परीक्षेत यश मिळवले. छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत परीक्षेत यश मिळविले. निकालानंतर विद्यार्थ्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.
औरंगपुरा, विद्यापीठात जल्लोष
सुनील खचकड हा शहरातील औरंगपुरा भागात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. पीएसआय परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर सायंकाळी सुनीलच्या मित्रांनी एकच जल्लोष केला. कला शाखेतून पदवी मिळवलेला सुनील पाच वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहे.
कालावधीत त्याने सन २०१८ आणि २०१९ साली पीएसआय पदाची परीक्षा दिली. मात्र, दोन्ही वेळा त्याला यशाने थोडक्यात हुकलावणी दिली. सन २०२० साली त्याने तिसऱ्यांदा परीक्षा दिली. त्याचा निकाल आज जाहीर झाला. त्यात तो राज्यात पहिला आला आहे.
विविध अभ्यासिकांमध्ये तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले मित्र परीक्षेत यशस्वी ठरल्यानंतर पेढे वाटून, पुष्पहार, गुलाल उधळत मित्रांचे अभिनंदन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील एमएसडब्लूचा विद्यार्थी अरुण साळवे यानेही यश मिळविले. मुख्य ग्रंथालयात तयारी करणाऱ्या अरुण व इतर यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रंथालयात जल्लोषात स्वागत करण्यात आले.