मुलीच्या विनयभंगप्रकरणी पुणे मोटार परिवहन विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले; तर पीडित मुलीच्या वडिलांना धमकी देणारा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील एका वाहनाचा चालक दिनकर साळवे याची गृह विभागाने चौकशी सुरू केली आहे.
नवी मुंबईतील खारघर येथे रहाणारे व पुण्यात मोटार ट्रान्स्पोर्ट विभागात कार्यरत असलेले मोरे यांच्याविरोधात ओळखीतील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार आहे. तळोजा पोलिसांनी मोरे यांच्याविरोधात विनयभंगासह पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. मात्र, याच दरम्यान सोमवारी पीडित मुलगी बेपत्ता झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले. अखेर याची राज्य सरकारने दखल घेतली. मोरे यांच्या निलंबनाचा आदेश गृह विभागामार्फत जारी करण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
मुख्यमंत्र्याच्या ताफ्यातील एका वाहनाचा चालक दिनकर साळवे याने धमकी दिल्याचा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केल्याने हे प्रकरण अधिकच तापले. साळवे यापूर्वी मोरे यांच्या गाडीचा चालक होता. मोरे यांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणीदरम्यान मुलीचे वडील व भाऊ पनवेल न्यायालयात गेले असता, साळवे याने, ‘मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ड्रायव्हर आहे, याचा विचार करून पुढचं पाऊल उचला,’ अशी धमकी दिल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला. या प्रकारानंतर मुलीच्या भावाने तळोजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचीही गृहमंत्री देशमुख यांनी दखल घेतली. ‘मोटार वाहन विभागातील वाहनचालक दिनकर साळवे मुलीच्या घरी गेला होता, अशी माहिती आहे. त्या वाहनचालकाची चौकशी करून त्यानंतर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल,’ असे ते म्हणाले. ‘साळवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील एका वाहनाचा चालक होता. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या वाहनाचा चालक नव्हता,’ असेही त्यांनी एका प्रश्नावर स्पष्ट केले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times